
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ११ सप्टेंबर
देसाईगंज तालुक्यातील फरी-झरी जंगल परिसरात सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास मोठ्या पट्टेदार वाघाने हल्ला करून एका महिलेला ठार मारल्याची घटना घडली. सदर महिलेला वाघाने जंगलात ओढत. नेले असता गावकऱ्यांनी लगेच धावा घेतला मात्र महिलेचा मृत्यू झाला होता.
महानंदा दिनेश मोहुर्ले असे मृतक महिलेचे नाव असून ती शिवराज-फरी मार्गावर फरी तलावाच्या विरुद्ध बाजूला असलेल्या झुडपी जंगला लगत असणाऱ्या स्वतःच्या शेतावर गवत काढायला गेली होती. ती गवत काढण्यात मग्न असतांना अचानक पट्टेदार वाघाने हल्ला केलाव ठार केले. हल्ला होताच महानंदाने प्राणांतिक किंकाळी फोडली. किंकाळीचा आवाज ऐकताच आजूबाजूच्या शेतात असलेले शेतकरी आणि मजूर आवाजाच्या दिशेने धावले. तेव्हा वाघ महानंदाचे शरीर ओढून नेत असल्याचे दिसून आले. लोकांनी मोठमोठ्याने आवाज करीत धाव घेतली असता वाघ पळून गेला. मात्र तोपर्यंत महानंदाचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे. वन्यजीवांच्या हल्ल्यामध्ये झालेल्या नुकसानीची तात्काळ व दीर्घकालीन भरपाई नियमांनुसार पिडीत परिवाराला देण्यात येणार असल्याचे वडसा वन विभागाचे विभागीय वनाधिकारी धर्मवीर सालविठ्ठल यांनी सांगितले. त्यांनी नागरिकांना आणि शेतीकामावर जाणारे, गुराखी अशा सर्व संबंधिताना मोठ्या गटागटाने कामावर जाण्याचे आवाहन केले आहे.