वसुधैव कुटूंबकम सांगणारे पंतप्रधान मोदी हे मणिपूर वर भाष्य कां करीत नाहीत
माजी मंत्री वसंत पुरके यांचा सवाल

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.७ ऑक्टोबर
वसुधैव कुटूंबकम अर्थात संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे असे सांगणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूर वर भाष्य कां करीत नाहीत किंवा बिल्किस बानोची भेट कां घेत नाहीत. मणिपूर मधील नागरिक, तेथे जाऊन वास्तव मांडणारे पत्रकार किंवा बिल्किस बानो हे मोदींच्या वसुधैव कुटूंबकमच्या व्याख्येत बसते की नाही? असा गंभीर प्रश्न माजी मंत्री वसंत पुरके यांनी उपस्थित केला आहे.
ते कांग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेत गडचिरोली येथे गुरुवारी सहभागी झाले होते. यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुरके पुढे म्हणाले की देशात सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. पंतप्रधान मोदींचे सरकार तानाशाही, हिटलरशाही पद्धतीने वागत आहे. सर्वत्र जाती – जातीत, धर्मा – धर्मात विद्वेष पसरवला जात आहे. महागाईने देश होरपळतोय. पत्रकारांना सुद्धा स्वातंत्र्य राहिले नाही. सरकार विरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरवून त्यांचे विरोधात खटले भरले जात आहेत.
यासाठी कांग्रेसने राहुल गांधीच्या ३५०० किमीच्या पदयात्रेच्या वर्षपूर्ती निमित्ताने पुन्हा देशभरात लोकसंवाद सुरू केला आहे. कांग्रेस या जनसंवाद यात्रेतून देशभर सामाजिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणण्याचे काम करीत आहे.
राहुल गांधीं हे लोकांना समजून घेणारे नेते आहेत. भाजपने सातत्याने गांधी परिवाराला टीकेचे लक्ष्य केले. परंतु ते डगमगले नाहीत. भाजपने काँग्रेस मुक्त भारताची आरोळी दिली त्यातून कांग्रेस उठून उभी राहिली. हीच कांग्रेस आगामी लोकसभेच्या निवडणुकीत देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा ठाकणार आहे. संवैधानिक लोकशाहीत बेजबाबदारपणा, अविवेकी भुमिका, अतिरेक किंवा विरोधी पक्षांना संपवण्याची भाषा करणे हे अभिप्रेत नाही. हा देश सर्वांचा आहे, हे ध्यानात ठेवले पाहिजे. असेही ते म्हणाले.
मणिपूर मधील संघर्षाची बीजं ही कोलमाइन्स मधे आहेत. मोदींच्या मित्राला या खाणींसाठी जमिनी देता याव्यात यासाठी तेथील संपन्न मैतेयींना आदिवासींचा दर्जा देण्याची खेळी खेळली जात आहे. आता ते जमीनी खरेदी करून अदानीला विकतील आणि त्यावर कोळशाच्या खाणी उभ्या राहतील.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ते म्हणाले की आरक्षण हे खिरापत वाटण्याचा विषय नाही. यासाठी संसदेत एक विशेषज्ञांची समिती स्थापन करून तिच्या शिफारशी लागू करण्याची गरज आहे. जातीनिहाय जनगणना हे कांग्रेसने मान्य केलेला तोडगा असला तरी तो केवळ एकच मुद्दा ग्राह्य धरला जाऊ शकत नाही.
यावेळी कांग्रेसचे नेते मारोतराव कोवासे, माजी आमदार आनंद गेडाम, डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महिला जिल्हाध्यक्षा एड. कविता मोहरकर, भावना वानखेडे, डॉ. चंदा कोडवते, सतिश विधाते, विश्वजीत कोवासे, कुसूम आलाम यांचेसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.