राजकीय

राज्य सरकारनेच मराठा आरक्षणाची आग लावली – प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले

ओबीसी आणि इतर आरक्षणाच्या आगीत हात टाकला तर ते पोळल्याशिवाय राहणार नाहीत

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.६ सप्टेंबर 

आरक्षणाच्या समस्येवर जाती-जातीत तेढ निर्माण करुन संघर्ष सुरू करण्याचे कारस्थान भाजप प्रणीत राज्यसरकार करीत आहे. जालण्याचे उपोषण हे मुख्यमंत्र्यांनी करायला लावले. तर सौम्य लाठीचार्ज हा गृहमंत्र्यांनी करायला लावला. जेणेकरून संघर्षाची ठिणगी पडेल. आणि झालेही तसेच. परंतू त्यांच्या दुर्दैवाने फासे उलटे पडले आणि तीव्र लाठीचार्ज झाला. अशा प्रकारे महाराष्ट्रातील सरकारने मराठा आरक्षणाची  आग लावली . मराठा व ओबीसींच्या संघर्षाचा नवा डाव मांडला जात आहे. मात्र सरकारने मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या आगीत हात घालू नये, ते पोळल्याशिवाय राहणार नाहीत. अशी स्पष्ट चेतावनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी सरकारला दिली. ते कांग्रेसच्या जनसंवाद पदयात्रे निमित्ताने गडचिरोली येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पत्रकार परिषदेला कांग्रेसचे नेते नाना गावंडे, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार अविनाश वारजूरकर, नामदेव उसेंडी, आनंद गेडाम,पेंटारामा तलाठी, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, पंकज गुड्डेवार,जेसा मोटवानी, डॉ कोडवते, रविंद्र दरेकर यांचेसह कांग्रेसचे नेते उपस्थित होते.

पटोले पुढे म्हणाले की ओबीसींच्या वाटेला जाणे हे सरकारसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. आगीतून फुफाट्यात गेल्याशिवाय राहणार नाही. देशात सर्वत्र भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे, जनतेत असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे, शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंची प्रचंड भाववाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष दिसून येत आहे, चार पटीने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. अशावेळी तथाकथित विश्वगुरु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले हसऱ्या चेहऱ्याचे फोटो पेट्रोल पंप आणि कृषी सेवा केंद्रांवर लाऊन मिरवत आहेत. यापेक्षा देशाचे दुर्दैव कोणते? अशी बोचरी टीका पटोलेंनी केली.

राज्य सरकारवर तोफ डागताना, महाराष्ट्रात ७५०० मुली आणि महिला गायब झाल्या आहेत. मात्र गृहमंत्री चकार शब्दही काढत नाहीत. पावसाळा सुरू असतानाच टॅंकर सुरु करण्याची वेळ आली आहे. डेंग्यूमुळे मृत्यूचे प्रमाण वाढले, जीव जात आहेत. अशावेळी प्रशासन गंभीरपणे समस्यांकडे बघत नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधे जर लोकनिर्वाचित व्यवस्था असली तर नीट व्यस्थापन होते. मात्र राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच होऊ न देण्याच्या भूमिकेत आहे. परिणामी अव्यवस्था सुरू झाली. राज्यातील १७ जिल्ह्यांत पालकमंत्री नाहीत. त्यामुळे हे सरकार जनतेचे नव्हे तर ते खोक्यांचे आहे. योजनांच्या नावावर दिखावा करीत ग्रामीण लोकांना ऊचलून आणून जनता दरबार आयोजित करीत आहेत. अशी टीका पटोलेंनी केली. जनतेच्या या व्यथा समोर आणन्यासाठीच कांग्रेसने देशभर जनसंवाद पदयात्रा आयोजित केली आहे. आगामी अधिवेशनात सरकारसमोर आणून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विधीमंडळात आणि रस्त्यावर दोन्ही ठिकाणी संघर्ष करु असे त्यांनी सांगितले. आमच्या काही चुका झाल्या मुळे वोट बँकेवर परिणाम झाला होता. आता मात्र या चुका सुधारत आहोत. परिणामी आगामी काळात कांग्रेसची वोट बँक परत येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

जनसुनावणी ही सर्वांसाठी खुली आणि स्थानिक ठिकाणीच झाली पाहिजे
जनसुनावणीचा अर्थच स्वयंस्पष्ट आहे. ही जनतेत खुली आणि स्थानिक ठिकाणीच झाली पाहिजे. मुठभर लोकांच्या फायद्यासाठी गडचिरोलीतील खनिज संपदा लुटली जात आहे चुकीच्या पद्धतीने आणि नियमांचे उल्लंघन करून घेतल्या जाणाऱ्या जनसुनावणीला कांग्रेसचा विरोध आहे. या पूर्वी सुद्धा चुकिच्या पद्धतीने लॉयड्स मेटल्ससाठी जनसुनावणी घेतली होती . अशा  चुकीच्या जनसुनावणी विरोधात आम्ही न्यायालयात जाणार. असे नाना पटोले यांनी कोरची तालुक्यातील झेंडेपार येथील ५ प्रस्तावित खाणींना मंजूरी देण्यासंदर्भात १० आक्टोंबर रोजी गडचिरोली येथे होऊ घातलेल्या जनसुनावणी संदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!