आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय

गडचिरोलीच्या पालकमंत्र्यांचं नातं जिल्ह्यातील जनतेशी आहे की आणखी कुणा दगडाशी आहे – आमदार विजय वडेट्टीवार यांचा फडणवीसांना सवाल?

पक्ष प्रवेश सोहळ्यातून कांग्रेसचे शक्ती प्रदर्शन ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२७ ऑक्टोबर 

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सामान्यतः कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारु नये. असा राजकीय संकेत असताना, ते पायदळी तुडवून गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वतःहून घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्ह्यातील जनतेशी काहीही घेणेदेणे नाही. त्यांचा गडचिरोलीशी असलेला संबंध फक्त खाणीतून मिळणाऱ्या मलिद्याशी असल्याचा घणाघाती आरोप कांग्रेसचे विधानसभेचे गटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. ते सोमवारी गडचिरोली येथे आयोजित काँग्रेसच्या पक्षप्रवेश सोहळ्यात बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी  (शरद पवार गट) काँग्रेसचे नेते सुरेश पोरेड्डीवार , त्यांच्या पत्नी कविता पोरेड्डीवार यांचेसह शहरातील संपूर्ण गटाने कांग्रेस मध्ये प्रवेश केला. तथा शिवसेना व इतर पक्षांच्या अनेक कार्यकर्त्यांनी सुद्धा कांग्रेस मध्ये प्रवेश केला. अध्यक्षस्थानी कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार हर्षवर्धन सपकाळ होते. तर आमदार अभिजित वंजारी, रामदास मसराम, कांग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, काँग्रेसचे निरीक्षक संदेश सिंगलकर, प्रदेश सरचिटणीस रवींद्र दरेकर, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष रावत, पंकज गुड्डेवार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विश्वजित कोवासे, माजी नगराध्यक्ष एड.राम मेश्राम
यांचेसह अनेक मान्यवर नेते मंचावर उपस्थित होते.

श्री वडेट्टीवार पुढे म्हणाले की २०१४ पासून कांग्रेसला जी गळती लागली होती, ती आता थांबलेली असुन नवी भरती सुरू झाली आहे. हा गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा क्षण आहे असेही ते म्हणाले. राज्यातील सत्ताधारी भाजप व घटक पक्षांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे. अहेरीचा आमदार राजा ज्याला स्वतःची मुलगी सांभाळता आली नाही. तो जिल्हा जिंकण्याची भाषा करतो. खाणीच्या पैशातून जिल्ह्यात सत्ता गाजवण्याची भाषा करणारांना जनता यावेळी चांगलाच धडा शिकवेल.

पैसा फेक तमाशा देख ही भाजपची नीती : प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

पैसा फेक तमाशा देख हीच भाजपची नीती असल्याचे सांगून  कांग्रेस ने ७० वर्षात काय केले ? या भाजपच्या सवालावर त्यांनी कांग्रेस च्या कामाचा पाढाच वाचला.  ते म्हणाले की कांग्रेसचा विचार हा संविधानाचा विचार आहे. तर
भाजपचा विचार तोडा फोडा आणि राज्य करा असा आहे.
भाजपने गरिब आणि श्रीमंती यातील दरी वाढवली.

भाजप विचारधारेच्या लोकांनी पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, सावित्रीबाई फुले यांना प्रचंड त्रास दिला. आताही आम्हीच मोठे, बाकी सगळे कनिष्ठ हाच भाजपचा विचार असल्याची घणाघाती टीकाही  सपकाळ यांनी केली. गडचिरोलीच्या खाणीचे दररोजचे ३५० कोटींचे  उत्पन्न असुन त्यातील आपला वाटा मागण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीत येतात असा आरोप त्यांनी केला. वडेट्टीवार यांची ओबीसींच्या संदर्भातील भुमिका ही संतुलितपणे व्यक्त करावी असा सल्ला सपकाळ यांनी अप्रत्यक्षपणे वडेट्टीवारांना दिला .

आमदार अभिजित वंजारी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणूका असल्याचे सांगत सर्व कांग्रेसजनांनी एकजुटीने ही निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज झाले पाहिजे असे आवाहन करतानाच आपापल्या क्षेत्रातील मतदार याद्या तपासून घेण्याचा मोलाचा सल्ला दिला. तर आरमोरीचे आमदार रामदास मसराम यांनी कांग्रेस सामान्य कार्यकर्त्यांची कदर करणारा पक्ष असल्याचे सांगत पक्षाचे प्रामाणिकपणे काम करा. पक्ष नक्कीच तुमची दखल घेईल असे आश्वासन दिले.

सुरेश पोरेड्डीवार यांचेसह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष विजय गोरडवार, माजी नगरसेविका मीनल चिमूरकर, संध्या उईके, कविता बोबाटे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या मनिषा खेवले, रामचंद्र वाढई यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाचे संचालन शहराध्यक्ष सतीश विधाते यांनी केले. तर आभार प्रदर्शन जीवन नाट यांनी केले. प्रवेश सोहळ्याला कांग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!