आरोग्य व शिक्षण

१९ ऑगस्ट ला होणारे पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानववाद अध्यासनाचे उदघाट्न रद्द करा-आदिवासी युवा विकास परिषदेची मागणी

दीनदयाल उपाध्याय अध्यासन केंद्रा विरोधात आदिवासींचा आक्रोश

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१३ ऑगस्ट 

गोंडवाना विद्यापीठाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि जनसंघाचे अध्यक्ष राहिलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय यांची कडव्या हिंदुत्ववादाची विचारधारा असलेली “एकात्म मानववाद” संकल्पना राबविण्यासाठी विध्यापिठात पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानववाद अध्यासन निर्माण केले असून १९ आगष्ट ला त्याचे विद्यापीठात उद्घाटन आयोजित केले आहे. या अध्यासनाचे निर्माण करून आदिवासींचे जबरीने वनवासीकरन करणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा गोंडवाना विद्यापीठात शिकविण्याचा कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी घाट घातला आहे. आदिवासी विकास युवा परिषद विध्यापिठाच्या या संविधान विरोधी कृतीचा तीव्र शब्दात निषेध करीत १९ आगष्ट ला त्याचे विद्यापीठात होणारे उद्घाटन रद्द करावे अन्यथा हा कार्यक्रम उधळून लावण्यात येऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आदिवासी विकास युवा परिषदेने दिला आहे.

गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे हे त्यांच्या नियुक्ती पासूनच वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर समर्थक असलेले डॉ. बोकारे हे गोंडवाना विद्यापीठाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रयोगशाळा बनवीत असून संघाची कट्टर विचारधारा राबविण्यासाठी आपल्या पदाचा दुरुपयोग करून ते विद्यापीठातील संसाधनांचा यासाठी वापर करीत असतात. असा आरोप आदिवासी विकास परिषदेने केला आहे. या आधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विधार्थी शाखा असलेल्या अखिल भारतीय विध्यार्थी परिषदेचे संस्थापक दत्ताजी दिडोळकर यांचे नाव गोंडवाना विद्यापीठाच्या निर्माणाधीन सभागृहाला देण्याचा ठराव विद्यापीठाच्या अधिसभेत त्यांनी दबाव टाकून मंजूर करून घेतला होता. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील विविध संघटनांनी या निर्णयाविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त केला होता. संपूर्ण महाराष्ट्रातून या निर्णयाला विरोध झाल्याने कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी जाहीररीत्या हा निर्णय मागे घेतला होता. ते संघाची विचारधारा विद्यापीठातून रुजवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला आहे

पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जन्म मथुरा येथे २५ सप्टेंबर १९१६ ला झाला आणि मृत्यू ११ फेब्रुवारी १९६८ ला झाला. ते १९३७ साली कानपूर येथे संघाचे स्वयंसेवक झाले व १९४२ मध्ये प्रचारक झाले. १९६७ पर्यंत ते भारतीय जनसंघाचे महामंत्री राहिले आणि कालिकत येथील अधिवेशनात त्यांची जनसंघाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला. त्यांनी ‘राष्ट्रधर्म’ नावाचे कट्टर हिंदुत्ववादी मासिक काढले व पुढे ‘पांचजन्य’ व ‘स्वदेश’ या वृत्तपत्राची स्थापना केली. १९६५ साली त्यांनी एकात्म मानववाद ही संकल्पना मांडली.

गोंडवाना विद्यापीठ हे गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी समाजाला उच्च शिक्षणाची दारे खुले करण्यासाठी निर्माण झाला आहे. या विध्यापिठातून आदिवासी समाजाची अस्मिता व संस्कृतीचे रक्षण केल्या जाणे अपेक्षित आहे. गोंडवाना विद्यापीठ हे संविधानातील मुल्यांची रुजवणूक करणारे पुरोगामी विचाराचे असावे. हे अपेक्षित आहे. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांना विविध संघटनांनी वेळोवेळी निवेदने देऊन विध्यापिठात महात्मा फुले अध्यासन, वामनदादा कर्डक अध्यासन, वीर बाबुराव शेडमाके अध्यासन आदी अध्यासन सुरु करण्याची मागणी केली आहे. मात्र डॉ. बोकारे यांनी या मागण्यांना केराची टोपली दाखविली असून पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानववाद अध्यासन मात्र तत्काळ मंजूर करून यासाठी १५ लक्ष रुपयांची तरतूद देखील केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराला या विद्यापीठात रुजविण्यासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेणारे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे हे संविधान विरोधी कृती करीत असल्याने त्यांची तत्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!