विषबाधित विद्यार्थिनींचा आकडा १३० वर ; ही तर प्रशासकीय उदासीनतेची विषबाधा
४० विद्यार्थीनी जिल्हा रुग्णालयात अजूनही घेत आहेत उपचार

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २१ डिसेंबर
धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय मुलींच्या आश्रमशाळेतील वसतीगृहात राहणाऱ्या मुलींना काल बुधवारी दुपारच्या भोजनानंतर विषबाधा झाली. आज बाधित मुलींची संख्या २२ ने वाढून ती आता १२९ वर पोहोचली आहे. काल आणि आज मिळून ४० विद्यार्थीनींना जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. घटनेला ४८ तास उलटल्यानंतरही विषबाधेचे प्राथमिक कारण पुढे आलेले नाही. तरीही अनधिकृत सुत्रांकडून, अन्नातून विषबाधा झाली असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असल्याचे समजते.
बुधवारी घडलेल्या घटनाक्रमानंतर प्रस्तुत संपादकाने सोडे येथील आश्रमशाळेत जाऊन घटनेचा प्रत्यक्ष आढावा घेतला असता प्रस्तुत विद्यार्थिनी या केवळ अन्नातून झालेल्या विषबाधेच्या नव्हे तर त्या आदिवासी विकास विभागातील प्रशासकिय ऊदासिनता, संवेदना हीनता आणि अक्षम्य दुर्लक्षाच्या विषबाधेच्या बळी ठरल्या आहेत. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. अन्यथा आदिवासी विकास विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली असती इतकी विदारक परिस्थिती आहे.
आश्रमशाळेतील वसतीगृहात ३६९ मुली शिक्षणासाठी रहात आहेत.परंतु येथे केवळ १२० मुलींच्या निवासाची व्यवस्था केली आहे. त्यामुळे एकेका खोलीत १५-१५ विद्यार्थ्यांनींना रहावे लागत असून जमिनीवर गाद्या टाकून झोपावे लागते. पिण्याच्या पाण्याचे तीन पैकी दोन आर ओ बंद आहेत. अधीक्षकांनी या संदर्भात प्रकल्प कार्यालयाला याबाबत माहिती देऊनही विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले. या शिवाय वसतीगृहात इतरही काही समस्या आहेत.
स्वयंपाकासाठी कंत्राटी कामगार आहेत. त्यांचेवर आश्रमशाळेतील प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
गुरुवारी धानोरा उपजिल्हा रुग्णालयात ११५ विद्यार्थ्यांनींना उपचारादरम्यान ४८ तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तरीसुद्धा डॉक्टरांनी सर्वांना शुक्रवारी सुटी दिली जाणार असल्याचे सांगितले. तर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात ४० विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत.
साळुंखे समितीच्या शिफारशीला केराची टोपली
साळुंखे समितीने प्रत्येक शासकिय आश्रमशाळेत प्राथमिक आरोग्य सेवेसाठी तात्काळ परिचारिकेची नेमणूक करावी अशी शिफारस केली आहे. परंतु याला आदिवासी विकास विभागाने अद्याप प्रतिसाद दिला नाही. विद्यार्थ्यीनींची आरोग्य तपासणी सुद्धा नियमित होत नसल्याचे पूढे आले आहे.
अन्न व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले
विषबाधेनंतर गुरुवारी अन्न व औषध प्रशासनाने सोडे येथील आश्रमशाळेत जाऊन शिजवलेल्या आणि कच्चे अन्न व पाण्याचे नमुने यासह उलट्या व इतर आनुषंगिक नमुने तपासणीसाठी गोळा करून अन्न विष्लेषक, अन्न व औषध प्रयोगशाळा नागपूर येथे पाठविले आहेत. मात्र याचे रिपोर्ट कधी मिळतील हे सांगणे कठीण आहे असे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. परिणामी विषबाधेचे नेमके कारण समोर येण्यासाठी किती दिवस लागतील हे सांगणे कठीण आहे.
विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भेट देऊन केली चौकशीची मागणी
घटनेनंतर कांग्रेसचे महासचिव तथा गडचिरोली लोकसभा समन्वयक डॉ नामदेव किरसान, शिवसेना ( उबाठा ) चे जिल्हाप्रमुख सुरेंद्र चंदेल, माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी, माजी सभापती छाया कुंभारे यांचेसह अनेक नेत्यांनी भेट दिली. दरम्यान विषबाधेच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, आश्रमशाळेतील व्यवस्थापनात सुधारणा करण्यात यावी, विद्यार्थ्यीनींच्या संख्येनुसार नवीन वसतीगृह बांधण्यात यावे, कायम स्वरुपी परिचारिका नियुक्त करावी अशा मागण्या केल्या आहेत.