गडचिरोली जिल्ह्यातील समस्या विधानमंडळात मांडा
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची विनंती

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २० जुलै
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी विविध आयुधे वापरून गडचिरोली जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी पूढाकार घ्यावा. अशी विनंती गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर अडबाले यांची भेट घेऊन केली आहे.
जिल्ह्यात वर्तमान परिस्थितीत महाविकास आघाडीचा एकही लोकप्रतिनिधी नसल्याने आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधी च्या उदासीनतेमुळे जनतेच्या प्रश्नांना बगल दिल्या जाते व सरकारच्या मनमर्जीप्रमाणे कारभार केला जातो. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसली आहे.
सुरजागड वाहतुकीमुळे जिल्ह्यातील झालेली रस्त्यांची दुरवस्था व त्यामुळे दिवसेंदिवस होत असलेले अपघात टाळण्यासाठी , रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत सुरजागड खदानीची वाहतूक पूर्णतः बंद करावी. तलाठी आणि वनरक्षक भरतीत जिल्ह्यातील गैर आदिवासी समाजावर मोठा अन्याय झाला असून तो दूर करण्याकरिता वनरक्षक आणि तलाठी भरतीत गैरआदिवासी करीता अधिक जागा वाढवून देण्यात याव्या, सरकारने नुकताच जाहीर केलेल्या शासन निर्णयात निवृत्त शिक्षकांना मानधन तत्वावर कामावर घेण्यात येत आहे त्याचप्रमाणे सुशिक्षित बेरोजगार पात्र तरुणांना प्राधान्याने संधी देण्यात यावी, जिल्ह्यातील रिक्त पदांची तातडीने भरती करण्यात यावी व मेडिगट्टा धरणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मागील वर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यावर्षी तसे होऊ नये यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी, एक वर्षांपासून जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली नसल्याने जिल्ह्याचा विकास खुंटला आहे, अधिकाऱ्यांच्या मनमर्जीने कारभार चालवला जात आहे. याकडेही सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण आवाज उठवावा विनंती ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.