आपला जिल्हाताज्या घडामोडी

गडचिरोली पोलीस भरती; प्रकल्पग्रस्तांच्या बनावट प्रमाणपत्रांनंतर आता क्रिडा आरक्षणातही बनावट प्रमाणपत्रांचा खेळ

स्थानिक गून्हे शाखेकडून चौकशी सुरू

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.१८ जून 

नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत काही उमेदवारांनी प्रकल्पग्रस्तांचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणी अद्याप आरोपपत्र दाखल होणे बाकी असतानाच क्रीडा आरक्षणाच्या कोट्यातील उमेदवारांनी देखील बनावट प्रमाणपत्राच्या माध्यमातून लाभ घेतल्याचे प्रकरण बाहेर आले आहे.

गडचिरोली जिल्हा पोलीस दलात चार महिन्यांपूर्वीच भरती प्रक्रिया राबविण्यात आली. एकूण ३४८ जागांसाठीच्या या भरतीत काही उमेदवारांनी प्रकल्पग्रस्तांच्या आरक्षण कोट्यातून नियुक्ती मिळवली होती. मात्र, या उमेदवारांचे प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र बनावट निघाले होते. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान पोलिसांना क्रीडा विभागाच्या आरक्षण कोट्यातही बनावट प्रमाणपत्र जोडून काही उमेदवारांनी अवैधपणे नोकरीचा लाभ घेतल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे मार्गदर्शनात या विषयाचा छडा लावण्याचे काम स्थानिक गून्हे शाखेकडून सुरू करण्यात आले.

प्रकल्पग्रस्तांचे बनावट प्रमाणपत्र देत नोकरीचा लाभ घेतल्याच्या आरोपावरून दोन नवनियुक्त पोलिसांसह प्रतीक्षेतील एकास अटक झाली होती. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी बनावट प्रमाणपत्र सादर करून भरती झालेल्या उमेदवारांचे तसेच हे प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या रॅकेटमधील लोकांचे अटकसत्र राबविले गेले. या प्रकरणातील आरोपी अद्याप जेल मध्ये आहेत.
आता बनावट क्रीडा प्रमाणपत्र देऊन पोलीस दलात भरती झालेले उमेदवारदेखील पोलीसांच्या रडारवर आले आहेत, नागपूर येथील एका शारिरीक शिक्षण महाविद्यालयाचे बनावट प्रमाणपत्र जोडलेल्या सात जणांची चौकशी अंतिम टप्प्यात आली असून गडचिरोलीतील एक पत्रकार व एक क्रिडा प्रशिक्षकाच्या माध्यमातून दोघांनी बनावट क्रीडा प्रमाणपत्र देऊन खेळाडू कोट्यातून भरतीचा लाभ घेतल्याच्या आशंकेवरुन गुन्हे शाखेमार्फत चौकशी सुरू आहे. याप्रकरणात बनावट प्रमाणपत्र दिलेले लाभार्थी व असे प्रमाणपत्र बनवून देणाऱ्या रॅकेट चालवणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!