भारतीय माणसाचे दरडोई उत्पन्न १.९७ लाख रुपये; पंतप्रधान मोदींच्या काळात गरीबी कमी झाली – खा. अशोक नेते

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२९ मे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत देशातील गरीबी कमी झाली असून प्रत्येक माणसाचे दरडोई उत्पन्न १ लक्ष ९७ हजार रुपये झाले असल्याची माहिती गडचिरोली चिमुर लोकसभेचे खासदार अशोक नेते यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ते भाजपच्या महा जनसंपर्क अभियानाचे स्वरूप स्पष्ट करीत होते.
यावेळी आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजभे, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, महामंत्री रविंद्र ओल्लालवार, प्रमोद पिपरे, प्रकाश गेडाम,सुधाकर येनगंधलवार, प्रशांत वाघरे, रेखा डोळस यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.
खा. नेते यांनी यावेळी कांग्रेसची ६० वर्ष आणि भाजपची ९ वर्ष यांची तुलना करताना सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात १७६ लोकहितोपयोगी योजना राबविण्यात आल्या. प्रत्येक योजनेचे पैसे लाभार्थींच्या खात्यावर जमा केले. दळणवळणाच्या व्यवस्था वाढल्या, कृषी, शिक्षण, आरोग्य, आवास अशा गरीब कल्याण योजना राबविण्यात आल्या, व्यापार वृद्धीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा स्तर वाढला आणि तिने जागतिक क्रमवारीत १० व्या क्रमांकावरुन ५ व्या क्रमांकावर उसळी घेतली. मोदी सरकारची ही यशस्वी कामगिरी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठीच ३० मे ते ३० जून या कालावधीत महा जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप एकाच वेळी संपूर्ण देशभर हे अभियान राबवित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अभियानात घर चलो या जनसंपर्क कार्यक्रमासह केंद्रीय मंत्र्याची मोठी सभा, बुद्धिजीवी, व्यापारी, युवा, महिला, दलीत, आदिवासी, ओबीसी सम्मेलन घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप घेणार लाभार्थी सम्मेलन !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी देशात विविध योजना राबवून जनतेला त्या योजनांचा लाभ दिला. अशा लाभार्थ्यांची देशभर सम्मेलन घेण्यात येणार आहेत. या सम्मेलनाचा अर्थ असा निघतो की भाजपचे नेते आणि कार्यकर्ते देशभरातील सर्व लाभार्थ्यांना हे सांगणार की आमच्या सरकारमुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेमुळे हा लाभ तुमच्या पदरात पडला. हे तुम्ही विसरता कामा नये. तुम्ही नरेंद्र मोदींचे आणि पर्यायाने भाजपचे मीठ खाल्ले असल्यामुळे खाल्ल्या मिठाला जागून भाजपलाच मतदान करा.