वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या तत्परतेने हरिणीला जीवनदान

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १६ एप्रिल
पोर्ला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या तातडीच्या कारवाईमुळे रविवारी सकाळी शेतकऱ्याच्या विहीरीत पडलेल्या एका हरिणीला जीवनदान देण्यात वनविभागाला यश आले आहे.
पोर्ला वनपरिक्षेत्रातील किटाळी नियतक्षेत्राततील मौजा आकापुर येथील वामन रामचंद्र झरली यांचे शेतातील विहिरीमध्ये सकाळी ६ वाजताच्या सुमारास हरिण पडले असल्याची माहिती संयुक्त वन व्यवस्थापन समिती किटाळीचे अध्यक्ष वामन रामचंद्र झरली यांनी वनपरिक्षेत्र कार्यालयास दिली. माहिती मिळताच पोर्ला वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. मडावी हे आपली टिम घेऊन घटनास्थळी हजर झाले. हरिण विहीरीमध्ये पडून असल्याचे निदर्शनास आले तेव्हा तात्काळ वन्यजीव विभाग वडसा यांचेशी संपर्क साधून हरणाला मुक्त करण्यासाठी संपर्क साधला. वनरक्षक संदिप तिजारे व वाहन चालक मनान शेख यांनी किटाळी वनरक्षक एस. जी. लामकासे, व त्यांचे अधिनस्त चमू यांचे सहाय्याने हरिणीला यशस्वीरीत्या विहिरीतून काढून जंगलात मोकळेपणाने सोडण्यात आले. भविष्यात अशा प्रकारची कोणतीही घटना आढळल्यास वनविभागास सहकार्य करण्याचे आवाहन अध्यक्ष संयुक्त वन व्यवस्थापन किटाळी तथा वनपरिक्षेत्र अधिकारी, पोर्ला यांनी केलेले आहे.