आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वस्तीगृहातील समस्या माझ्या कार्यकक्षेत येत नाहीत : जिल्हाधिकारी उवाच

समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहातील समस्याग्रस्त विद्यार्थ्यांसोबत अरेरावीची भाषा : विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध करीत केली घोषणाबाजी

गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या असंवेदनशीलतेचा कळस

 हेमंत डोर्लीकर, पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली

सामाजिक न्याय विभागा मार्फत गडचिरोली शहरात चालविल्या जाणाऱ्या विविध वस्तीगृहांतील शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी मंगळवारी दुपारी एक वाजता त्यांना सतत उद्भवणाऱ्या समस्यांची सोडवणूक व्हावी म्हणून, आपल्या व्यथा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात गेले व निवेदन देऊन समस्या सोडविण्याची विनंती केली असता जिल्हाधिकारी संजय मीना यांनी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहातील समस्या माझ्या कार्यकक्षेत येत नाहीत. त्यामुळे तुम्ही इथे कशासाठी आलात अशी अरेरावीची भाषा वापरीत त्यांना जवळजवळ हाकलून लावले. मात्र आमचे समाधान झाल्याशिवाय आम्ही जाणार नाही. अशी विद्यार्थ्यांनी भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठिय्या मांडला. सायंकाळी पाच ते साडेपाच वाजता पर्यंत विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या संवेदनशीलतेला पाझर फुटला नाही.

अखेर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर हे ठिय्या आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना भेट देऊन पाच विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधी मंडळाला चर्चेला बोलावले आणि पुन्हा तीच अरेरावीची भाषा करीत, हा माझा विषय नाही हे सांगितल्यानंतरही तुम्हाला कळत नाही काय? मी यात काहीही करू शकत नाही. असे सांगून प्रतिनिधी मंडळाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. या प्रकाराने संतप्त विद्यार्थ्यांनी असले जिल्हाधिकारी काय कामाचे अशी नारेबाजी करीत संजय मीना यांचा जोरदार निषेध केला. या सर्व प्रकारातून गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना यांनी संवेदनहिनतेचा कळस गाठला असल्याची बाब पुढे आली आहे.

उल्लेखनीय आहे की जिल्ह्यातील कोणत्याही संदर्भातील पीडित व्यक्ती किंवा समूह हे न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे जातात असे संकेत आहेत राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणूनही त्यांचे कार्यक्षेत्रात सर्वच विभाग येतात. असे असताना वस्तीगृहात शिक्षण घेणाऱ्या दलित, पीडित, आदिवासी, गरीब विद्यार्थ्यांचे प्रश्न माझ्या कार्य कक्षेत येत नाही असे सांगणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न वंचितचे बाळू टेंभुर्णे यांनी केला असून या संदर्भात हे प्रकरण मुख्यमंत्र्याकडे लावून धरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना या संपूर्ण सत्रात त्यांच्या खर्चाचा एकही रुपया मिळालेला नाही. वस्तीगृहात पायाभूत सुविधांचा प्रचंड अभाव आहे. साधे पिण्याचे पाणी सुद्धा शुद्ध मिळत नाही, पैशांच्या अभावी त्यांच्या शिक्षणावर विपरित परिणाम होत आहे. भोजनासह शैक्षणिक साहित्य कसे खरेदी करावे? असे अनेक प्रश्न त्यांचेसमोर आ वासून उभे राहिले आहेत. या संदर्भात गृहपाल ते समाज कल्याण आयुक्त यांचे पर्यंत पत्रव्यवहार आणि चर्चा केली गेली परंतु त्यांच्या समस्या सुटल्या नाहीत अखेर ते जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले परंतु तिथेही त्यांच्या शिक्षणाचा अनादर केला गेला. या गंभीर प्रकाराने विद्यार्थी अत्यंत व्यतिरित आणि संतप्त असून भविष्यकाळात त्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

जिल्हाधिकारी हटाओची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार

एकीकडे शिक्षणाचा अधिकार मुलभूत अधिकारात स्वीकार केला गेला असताना समाजकल्याणच्या वसतीगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या गरिब,दलीत, आदिवासी अशा विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून त्याची सोडवणूक करणे सोडून उर्मटपणे माझा विषय नाही हे सांगणाऱ्या जिल्हाधिकारी संजय मीना यांचा वंचित बहूजन आघाडीचे वतीने निषेध करतो आणि असा जिल्हाधिकारी हटाओ अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. यासाठी आंदोलन उभारावे लागले तरी बेहत्तर.
बाळू टेंभूर्णे – जिल्हाध्यक्ष वंचित बहूजन आघाडी, गडचिरोली

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!