आपला जिल्हा

खोट्या गुन्ह्यात अडकवून पोटेगाव पोलिसांनी केली मारहाण : माया मडावी यांचा आरोप

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१२ फेब्रुवारी 

दारुविक्री करीत नसतानाही दारुविक्रीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पोटेगाव पोलिस मदत केंद्राचे उपनिरीक्षक विनय गोडसे यांनी आपणास बेदम मारहाण केल्याचा आरोप माया मडावी यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

पत्रकार परिषदेला माया मडावी यांचे पती मंगेश मडावी उपस्थित होते. माया मडावी यांनी सांगितले की, आम्ही पोटेगाव येथे वास्तव्य करीत असून, पती मंगेश मडावी यांची प्रकृती बरी राहत नसल्याने दीड वर्षांपूर्वी दारुविक्री करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होतो. परंतु त्यावेळी पोलिसांनी पती मंगेश मडावी यांनी पोलिस मदत केंद्रात बोलावून दिवसभर बसवून ठेवले. शिवाय दारुविक्री न करण्याची तंबी दिली होती. तेव्हापासून आपण दारुविक्री करीत नाही. असे त्यांनी सांगितले .

९ फेब्रुवारीला पोलिसांनी मंगेश मडावी यांना पोलिस मदत केंद्रात बोलावले. त्यानंतर आपणास बोलावून एका लिखित कागदावर स्वाक्षरी करण्यास सांगितले. परंतु आपण कागद वाचल्याशिवाय स्वाक्षरी करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने पोलिस उपनिरीक्षक विनय गोडसे यांनी आपणास बेदम मारहाण केली. एकूणच पोलिस उपनिरीक्षक गोडसे यांनी आपणास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न करुन मारहाण केली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी माया मडावी यांनी केली.

माया मडावीवर दारुविक्रीचा गुन्हा : पीएसआय गोडसे

या प्रकरणाच्या आदल्या दिवशी माया मडावी यांना दारु विकताना पोलिसांनी पकडले. त्यासंदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु कागदावर स्वाक्षरी करण्याऐवजी माया मडावी यांनीच शिवीगाळ करुन पोलिसांना बघून घेण्याची धमकी दिली, अशी प्रतिक्रिया पोलिस उपनिरीक्षक गोडसे यांनी दिली. त्यांना मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी कुठलाही त्रास दिला नाही, असे सांगून श्री.गोडसे यांनी माया मडावी आणि त्यांचे पती कोणत्या व्यावसायावर उदरनिर्वाह करतात असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. त्यांचा बोलविता धनी कुणी वेगळा असल्याचे त्यांनी सांगितले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!