आलापल्लीचे वनपरिक्षेत्राधिकारी योगेश शेरेकर यांच्या नियमबाह्यकामाची चौकशी करा
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे यांची मागणी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ९ मे
आलापल्ली येथील वनपरिक्षेत्राधिकारी योगेश शेरेकर यांनी पेरमिली वनपरिक्षेत्रात अतिरिक्त प्रभार असताना मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड तसेच अनेक नियमबाह्य कामे करुन शासनाची फसवणूक केलेली आहे. या नियमबाह्य कामाची चौकशी करावी अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे यांनी मुख्य वनसंरक्षक यांना निवेदन देऊन केली आहे
आलापल्ली वनपरिक्षेत्रात मार्च २०२२ मध्ये तसेच त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात गुरे प्रतिबंधक चर खोदकामात जेसीबी व इतर यंत्राच्या साह्याने कामे करून बोगस मजूरांच्या नावें खोट्या स्वाक्षऱ्या व खोटे व्हाऊचर बनवून शासनाच्या लाखो रुपयांच्या रकमेची अफरातफर केली. खोदकामात मोठ्या प्रमाणत आर्थिक अनियमितता, भ्रष्टाचार, बनावट मजूर, बनावट कागदपत्राचा वापर करून वरिष्ठांची तथा शासनाची दिशाभूल केलेली आहे. त्यांनी केलेल्या कार्यकाळातील कामाचे अंदाजपत्रक मोजमाप पुस्तिका व काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र, मजुरांचे हजेरीपटाची या त्यांच्या कार्यकाळात संपूर्ण कामाची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी खुणे यांनी केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात अतिदुर्गम व अतिसंवेदशील भागात रस्त्यांची कामे सुरू असताना कारवाईची भीती दाखवून अनेक कंत्राटदारांकडून लाखो रुपयाची माया जमवून अल्पावधीतच एक ते दीड कोटी रुपयांचे घर बांधले व इतर मालमत्ता जमविली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीच्या गोष्टी सांगून त्यांची मर्जी संपादन करूनआपले हित साधले. यापूर्वी क्षेत्रसहाय्यक या पदावर असताना सुद्धा अवैध कामे करत शासनाची दिशाभूल करून त्यांनी आर्थिक अनियमितता केली. सबब यांच्या कार्यकाळात जिल्हा विकास निधी मधुन प्राप्त झालेल्या संपूर्ण कामाची सखोल चौकशी करून चौकशी समिती गठीत करण्यात यावी. अशी मागणीही त्यांनी मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर यांना निवेदन देऊन केली यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे कृष्णा वाघाडे सूरज, हजारे उपस्थित होते.