भामरागड येथील पूर पिडितांना जन संघर्ष समितीच्या वतीने किराणा किटचे वाटप

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २२ जुलै
महाराष्ट्र व गडचिरोली जिल्ह्यातील अगदी शेवटचा तालुका म्हणजे भामरागड. महाराष्ट्रासह या भागात सतत पडत असलेल्या पावसामुळे या तालुक्यातून वाहणाऱ्या नद्यांनी उग्र रूप धारण केले होते. त्यामुळे, पुराचे पाणी थेट घरादारात शिरल्याने या भागातील आदिम समूदाय उघड्यावर पडला आहे. या समुदायला जनसंघर्ष समिती, नागपूरच्या वतीने किराणा किट व गरजू वस्तू प्रदान करून त्यांना जगण्याचे बळ देण्यात आले.
भामरागड येथे पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती नद्यांचा संगम आहे. जुलै महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसाने या नद्यांना व इतर नद्यांना पुर आल्याने या भागातील जनजिवन विस्कळीत झाले आहे. घरादारात पाणी शिरण्यासोबतच संपूर्ण शेतजमीन पाण्याखाली आली आहे. शिवाय, पुरामुळे हा संपूर्ण तालुका गडचिरोली जिल्ह्यापासून तुटला होता. आता पाऊस आणि पुर ओसरले असले तरी लहान नद्या दुथडी भरून वाहत असल्याने अजूनही अनेक दुर्गम गावे संपर्क यंत्रणेपासून अलिप्त आहेत. या भागात प्रवास करून आणि त्यांचे सुख-दु:ख जाणून घेऊन समितीच्या स्वयंसेवकांनी या परिसरातील पिडितांना मदतीचा हात दिला आहे. यावेळी जन संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता शिर्के, अभिषेक सावरकर,प्रशांत शेंडे , जगदीश ठाकरे, प्रवीण खापरे उपस्थित होते.