ताज्या घडामोडीराजकीय

भारत आता मागणारा नाही तर देणारा देश – जे.पी.नड्डा

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाची भारत जगातील ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून समोर आला.

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२ डिसेंबर 

संपूर्ण जग एकीकडे आर्थिक मंदीच्या संकटात सापडले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे विपरीत परिस्थितीत नेतृत्व करीत असतानासुद्धा ब्रिटनला पछाडून भारत जगातील ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून समोर आला. स्टीलचे दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक देश बनला. ९७ टक्के मोबाइलचा निर्माता बनला. फार्मसीटीकल्स फर्टीलायझर आणि स्टीलचा मोठा निर्यातदार बनून युरोप, अमेरिका, चीन पेक्षा लसीकरणाची चांगली कामगिरी करणाऱ्या देशासोबतच अनेक छोट्या देशांना मोफत लसी देणारा ठरला. त्यामुळे भारत जगात मागणारा नव्हे तर देणारा देश बनला आहे. असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा यांनी केले. ते चंद्रपूर येथे भाजपच्या विजय संकल्प रॅलीत बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अल्पसंख्याक प्रकोष्ठाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी, ओबीसी आयोगाचे अध्यक्ष माजी खासदार हंसराज अहिर, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, रामदास तडस,अनिल बोंडे, मनोज कोटक,प्रेम शुक्ला यांसह चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यातील भाजपचे आमदार यांसह अनेक नेते पदाधिकारी उपस्थित होते.

 

सत्तेसाठी ऊद्धव ठाकरेंनी पाठित खंजीर खुपसला

निवडणूकीत मोदींच्या नावावर मतं मागणाऱ्या ठाकरेंनी निवडणूक होताच अधिक आमदार आले म्हणून मुख्यमंत्री पदाची लालसा ठेऊन भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप नड्डा यांनी केला. उध्दव ठाकरे यांनी सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आणि विचारधारेसोबत समझोता केला आणि असंगाशी संग केला. परिणामी त्यांच्याच लोकांकडून त्यांना पाय उतार व्हावे लागले.

नड्डा पूढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची जगाने दखल घेतली आहे. ती उगीच नाही. युक्रेनचे युद्ध मोदींनी थांबविले, तिथे अडकलेल्या हजारो लोकांना परत आणले, कोरोना नियंत्रित करण्यासाठी अवघ्या नऊ महिन्यांत दोन वॅक्सिन तयार करण्यात यश संपादन केले, नव्हे तर भारतात दोन डोझ व बुस्टर डोझ देउन जगातील इतरही देशांना पूरवठा केला. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात सहा पट तर निर्यातीमध्ये सात पट वाढ केली, अति गरिबीचे प्रमाण एक टक्क्याच्या खाली आणले स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवून महिलांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. महिला सशक्तीकरणाच्या अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या, पंतप्रधान कृषी कल्याण योजनेसह उज्वला, डिजीटल इंडिया, आयुष्यमान भारत यासह अनेक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी मुळे भारत जगातील प्रभावशाली देश बनला. भाजपची ,जे बोलले ते पूर्ण केले आणि जे बोलणार तेही पूर्ण करणार अशी ख्याती आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपच्या सरकारचे हे यशस्वी रिपोर्ट कार्ड घेऊन जनतेच्या दरबारात गेलात तर भाजपचा कुठेही पराभव होणार नाही.असेही ते म्हणाले. संचालन जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!