आपला जिल्हाराजकीय

शेकापने वर्षभरात हजारो नागरिकांच्या समस्यांची केली सोडवणूक

जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांची पत्रकार परिषदेत माहिती

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २ जानेवारी

सामान्य माणसांसाठी शेतकरी कामगार पक्षाने गेल्या वर्षभरात फुटपाथवर जीवनयापन करणारे छोटे व्यावसायिक, अवैध रेती तस्करी, जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू, सुरजागड लोह खाण प्रकरण, शेतकरी आत्महत्या, मेडीगट्टा मुळे शेतकऱ्यांचे नुकसान यासह अनेक जिल्ह्यातील शेकडो नागरिकांच्या प्रश्नांवर व्यक्तीश:,  रस्त्यावर आणि विधिमंडळात संघर्ष, पाठपुरावा करून यश संपादन केले. जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाकडे खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असे कोणत्याही प्रकारचे लोकप्रतिनिधी नसतानाही सदर प्रश्नांवरील यश हे शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीशी जनसामान्यांचे भक्कम जनसर्थन असल्यामुळेच
शक्य झाले. अशी माहिती जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी नववर्षाच्या पर्वावर दिली. ते पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने गेल्या वर्षभरात शहरातील संघर्षनगरासह अतिक्रमण धारकांना दिलासा देण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे घरटॅक्स लावण्याचे काम झाले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या नावाने फुटपाथधारकांची दुकाने हटविण्यात आली होती. शेकाप सातत्याने फुटपाथ धारकांसोबत राहून पुन्हा दुकाने लावण्यात आली आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोन वेळा उद्घाटन होवूनही बंद असलेला सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज अतिदक्षता विभाग सुरू करण्यास प्रशासनाला भाग पाडले. हजारो शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यासाठी बँकांकडे पाठपुरावा करण्यात आला. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच मागील चार वर्षांपासून सिरोंचा तालुक्यातील मेडिगट्टा धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणुकीची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावी लागली. येणाऱ्या नव्या वर्षात मासेमारी सहकारी संस्थांचे बळकटीकरण, पिण्याच्या पाण्याची बारमाही सुविधा, वाघांच्या हल्ल्यांबाबत दीर्घकालीन उपाययोजना, जंगलावर आधारित उद्योग, पेसा क्षेत्रातील रेती तस्करी आणि दुष्काळग्रस्त शेतकरी, कष्टकरी, कर्मचारी, कामगार अन्यायग्रस्त जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी दिली.पत्रकार परिषदेला शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा खजिनदार श्यामसुंदर उराडे, जिल्हा सहचिटणीस संजय दुधबळे, जयश्री वेळदा, अशोक किरंगे, सरपंच सावित्री गेडाम, चंद्रकांत भोयर, तुकाराम गेडाम, कविता ठाकरे, हेमंत डोर्लीकर, कैलास शर्मा, विनोद मेश्राम, योगेश चापले, तितिक्षा डोईजड, देवीदास मडावी, देवराव शेंडे, मारोती आग्रे उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!