धर्मराव आत्राम आणि राजघराण्यातील नेत्यांचा ग्रामसभांसमोर भांडाफोड करून हाकलून लावा
आत्राम राजघराण्याच्या विरोधात नक्षलवाद्यांचे दुसरे पत्रक

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.३१ डिसेंबर
अहेरी येथील राजघराण्यावर नक्षल्यांनी दुसऱ्यांदा पत्रक प्रसिद्ध करुन आत्राम राजघराण्यातील नेत्यांना गावातून हाकलून लावा अशी सुचना केली आहे.
” लोकांना मरु द्या, संसाधनांची लूट होऊ द्या. ” तरीही मला लायड्सची चाकरी हवी अशा वृत्तीच्या आमदार धर्मरावबाबा आत्राम आणि इतर राजकिय नेते जर गावात आले तर ग्रामसभांनी अशा नेत्यांना ग्रामसभेसमोर ऊभे करुन नेत्यांच्या चेहऱ्यावरील बुरखा ओढून काढावा आणि त्यांचा भांडाफोड करून वास्तव जनतेसमोर आणावे . आणि त्यांना हाकलून द्यावे असे सदर पत्रकात म्हटले आहे.
सुरजागड पहाडातून जवळपास १ हजार एकर जमिनीवर विस्तार आणि उत्खनन करण्याच्या प्रस्तावाला माओवाद्यांचा विरोध असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
उल्लेखनीय आहे की, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी सूरजागड पहाडीवर लोहखनिजाच्या उत्खनन करणाऱ्या कंपनीची दलाली करत आसल्याचा आरोप करीत त्यांनी त्वरित हे काम थांबवावे अन्यथा बघून घेउन असा धमकीवजा इशारा दिला होता. यावर प्रतीक्रिया देताना आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी आपण जनतेला रोजगार देण्याच्या बाजूने असून या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार मिळत आहे. आपण नक्षलवाद्यांच्या धमक्यांना घाबरणार नसल्याचे सांगीतले. यावर तीव्र आक्षेप घेत राजघराण्यावर बहिष्कार टाका असे पत्रक पश्चिम विभागीय समितीचा प्रवक्ता श्रीनिवास यांनी सहीनिशी प्रसिध्द केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
सदर पत्रकात पूढे म्हटले आहे की आत्राम राजपरिवार हा संधीसाधू नेत्यांचा परिवार आहे. २०१९ च्या निवडणूकीत मते मागताना त्यांनी लॉयड्स ला विरोध केला आणि सत्तेत येताच लॉयड्सची चाकरी स्वीकारली. असेही श्रीनिवास याने म्हटले आहे.