गडचिरोलीचे भाजप आमदार डॉ.होळी यांची बदनामी करणाऱ्या ४० लोकांविरुद्ध पोलिसांत तक्रार
होळींचे पूर्व प्रसिद्धी प्रमुख आणि खासदार अशोक नेते यांचे विद्यमान लोकसभा प्रसिद्धी प्रमुख रमेश अधिकारी सह ४० जणांवर १ कोटी रुपयांची मानहानीची नोटीस
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली
भाजपचे खासदार अशोक नेते यांचे विद्यमान लोकसभा प्रसिद्धी प्रमुख रमेश अधिकारी यांचेसह भाजपच्या आणखी काही कार्यकर्त्यांसह ४० जणांविरुद्ध पोलीस तक्रार करीत त्यांचेवर १ कोटी रुपयांची मानहानीची नोटीस दिल्यामुळे एकुणणच गडचिरोलीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आपले राजकीय प्रतिस्पर्धी कोण हे न सांगताच आमदार डॉ होळींनी खासदार अशोक नेते यांचेवर अप्रत्यक्ष शरसंधान केले आहे.
भारतीय जनता पार्टीचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मेक इन गडचिरोली च्या नावाने अगरबत्ती क्लस्टर व मत्स्य तलाव यामध्ये फसवणूक केल्याचा आरोप करीत, त्याविरोधात गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील काही लोकांनी ३० नोव्हेंबर पासून नागपूर येथील संविधान चौकामध्ये उपोषण आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची प्रसिद्धी, विविध माध्यमांतून पत्रके व व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध झाली. यापूर्वी सुध्दा आमदार डॉ देवराव होळी यांनी मेक इन गडचिरोली या प्लॅटफॉर्मवरुन अगरबत्ती उद्योग आणि मत्स्य व्यवसाय यात अनेक नागरिकांची दिशाभूल केली असल्याचा आरोप करीत आपली बदनामी केली असल्यामुळे आपण ४० लोकांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली असून या सर्वांना १ कोटी रुपयांची मानहानीची नोटीस दिल्याची माहिती आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे.
यापूर्वीही करण्यात आलेल्या आरोपांसंदर्भात मविआ सरकारच्या काळात पोलिसांमार्फत चौकशी होऊन तथ्य नसल्याचे सिद्ध झाले आहे. याबाबत पोलिसांकडून दिनांक १७ ऑगस्ट २०२१ रोजी सूचना पत्र प्रसिद्धही करण्यात आले आहे. तरीही केवळ राजकीय सूडबुद्धीने घाणेरडे राजकारण करित असल्याचा आरोप आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे. मात्र हे आरोप करणारे स्वपक्षीय की विपक्षी हे त्यांनी सांगितले नाही.
मेक इन इंडिया व मेक इन महाराष्ट्र या संकल्पनेच्या धर्तीवर मेक इन गडचिरोली चा प्लॅटफॉर्म निर्माण करुन गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू केले. मेक इन गडचिरोली ही काही माझी संस्था किंवा संघटना नाही ही केवळ जिल्ह्याच्या विकासासाठी तयार केलेला प्लॅटफॉर्म आहे. याकरिता झालेले सर्व आर्थिक व्यवहार हे जिल्हा उद्योग केंद्र , सरकारी बँका व शासकीय कार्यालय यांच्या मार्फत झालेले असून शासनाचे नियम पाळून सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शकपणे व बँकेच्या मार्फत झालेले आहे. लाभार्थ्यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने समजून हे उद्योग सुरू केलेले आहेत. यामध्ये ज्यांनी मेहनत घेतली आहे त्यांचे उद्योग अजूनही सुरू असून ते उत्तमपणे चालवीत आहेत. ज्यांना उद्योग नीट चालविता आले नाहीत ते आरोप करीत आहेत असे ते म्हणाले.
पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष किसन नागदेवे, रवींद्र ओल्लारवार, प्रमोद पिपरे, योगिता भांडेकर, योगिता पिपरे, मुक्तेश्वर काटवे, विलास दशमुखे, मधुकर भांडेकर, भास्कर बुरे यांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
नागपूर येथील संविधान चौकामध्ये सुरू असलेले उपोषण राजकीय हेतूने प्रेरित
अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारात आपले नाव टीव्हीवर आल्याने विरोधकांच्या पोटात गोळा आला असून त्यांनी आपल्या बदनामीचे कट कारस्थान सुरू केलेले आहे. जिल्ह्यात आपल्या विरोधकांना तक्रार हाताशी धरून त्यांचे डोके भडकावून त्यांना पूर्ण आर्थिक सहयोग करून अधिवेशनापूर्वी नागपूर येथील संविधान चौकामध्ये माझ्या विरोधात उपोषण करण्यासाठी बसविले आहे. परंतु जिल्ह्यातील जनतेला हे सत्य माहीत आहे. परंतु आपले वारंवार होणारी बदनामी आपण सहन करणार नसून यापुढेही अशी बदनामी सुरू राहिल्यास जो आपली बदनाम करेल त्याला त्याच प्रकारे उत्तर दिले जाईल.
आ. डॉ. देवराव होळी