आपला जिल्हा

बाहेरून आणलेली आंबाडीची भाजी खाल्ल्याने आश्रम शाळेतील २२ विद्यार्थ्यांना विषबाधा 

विद्यार्थी रुग्णालयात, सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर, तपासणी अंती १८ विद्यार्थ्यांना डिस्चार्ज 

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली ६ डिसेंबर 

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड अंतर्गत येत असलेल्या कोठी येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार सोमवार ५ डिसेंबर रोजी घडला आहे. या आश्रम शाळेतील २२ विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून वैद्यकीय तपासणी नंतर मंगळवारी यातील १८ विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शासकीय आश्रम शाळेतील आदिवासी जमातीतील विद्यार्थ्यांना शासनाकडून निवासी सोय केली जाते. मात्र, काही विद्यार्थ्यांचे नातेवाईक स्थानिक गावात असल्याने सुट्टीच्या दिवशी नातेवाईकांच्या घरी जाणे अथवा त्यांच्याकडील भाजी वस्तीगृहात आणून इतर विद्यार्थ्यांसोबत मिळून जेवण करतात. सोमवारी सकाळी इयत्ता सहावीच्या एका विद्यार्थिनीने आपल्या आत्याच्या घरून आंबाडीची भाजी आणली व ती भाजी आपल्या सहा-सात मैत्रिणींशी वाटून खाली. यानंतर शाळेच्या वेळेस वस्तीगृहातून शाळेत गेले असता,अचानक काही मुलांना पोट दुखायला लागले आणि उलटीला सुरुवात झाली. शालेय प्रशासनाने याची माहिती वरिष्ठांना कळविली.

माहिती मिळताच वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश तीरनकर यांनी आपल्या चमूसह आश्रम शाळा कोठी गाठले. या विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे हलविण्यात आले. दरम्यान ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सातमवार यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून औषधोपचार सुरू केले असून त्यात सहा ते सात विद्यार्थ्यांना आंबाडीची भाजी खाल्ल्याने विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. तर उर्वरित सर्व विद्यार्थी घाबरून गेल्याने भीतीपोटी त्यांनाही असे जाणवायला लागले असावे असे त्यांचे म्हणणे आहे.
सर्व विद्यार्थी हे इयत्ता पाचवी ते दहावीचे आहेत. सर्व विद्यार्थी धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ भूषण चौधरी यांनी ग्रामीण रुग्णालय गाठून परत सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करून विचारपूस केली. त्या सर्व विद्र्थ्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली ठेवण्यात आल्याची माहिती आहे. २२ पैकी १८ विद्यार्थ्यांना आश्रम शाळेत परत पाठवले असून उर्वरित ४ विद्यार्थ्यांवर भामरागड ग्रामीण इस्पितळात उपचार सुरू आहेत.

 

 

 

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!