पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २९ ऑगस्ट
गस्तीवर असलेल्या एटापल्ली येथील नक्षलविरोधी शीघ्रकृती दल पोलीस पथकाच्या एका जवानाने सहकाऱ्यावर गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास एटापल्लीपासून जवळच असलेल्या आलदंडी मार्गावर घडली.
संतोष सिडाम असे आरोपी जवानाचे नाव असून विजय करमे असे जखमी जवानाचे नाव आहे. जखमी झालेल्या जवानाला नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
एटापल्ली उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या अखत्यारीत येत असलेल्या पोलीस पथकातील शीघ्रकृती दलाचे जवान सकाळी गस्तीवर होते. दरम्यान, संतोष आणि विजय या दोन जवानांमध्ये वाद झाला. यातून संतोषने विजयवर थेट गोळीबार केला. यात विजय गंभीर जखमी झाला असून त्याला तत्काळ हेलिकॉप्टरमधून नागपूर येथे नेण्यात आले. जखमी जवानाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.