कांग्रेस जर फेक नरेटीव्ह पसरवत असेल तर भाजपने स्वायत्त संस्थांच्या बचावासाठी भूमिका घेतली तर काय बिघडले! – माजी खासदार अशोक नेते यांचे प्रतिपादन
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २९ सप्टेंबर
कांग्रेस नेते राहुल गांधी देशभरातील स्वायत्त संस्थांवर अविश्वास दाखवत फेक नरेटीव्ह पसरवत आहेत. निवडणूक आयोगाच्या विरोधात चुकिचे वातावरण तयार करुन अनार्कि करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशावेळी संवैधानिक स्वायत्त संस्थांच्या बाजूने भाजपा जर उभी राहिली तर त्यात काय वावगे ठरणार आहे. असे प्रतिपादन भाजपचे आदिवासी आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी खासदार अशोक नेते यांनी केले. ते सोमवारी भाजप प्रदेशाच्या सुचनेवरुन आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
निवडणुकीतील विजय स्वीकारताना घटनात्मक संस्थांवर विश्वास दाखवायचा आणि पराभव झाल्यानंतर त्याच संस्थांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घ्यायचे, ही काँग्रेसची दुटप्पी भूमिका असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
यावेळी आमदार डॉ.मिलिंद नरोटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, शहराध्यक्ष तथा नगरपरिषद सभापती अनिल कुनघाडकर, जेष्ठ नेते सुधाकर येनगंदलवार, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, कि.मो.प्र.सचिव रमेश भुरसे, डॉ.भारत खटी यांच्यासह भाजपचे अनेक प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ.अशोक नेते पुढे म्हणाले की, काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून निवडणुकीतील पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडण्याचा प्रयत्न केला जातो. तेलंगणा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक यांसारख्या राज्यांमध्ये विजय मिळतो, तेव्हा निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला जात नाही; मात्र निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्याच आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. ही भूमिका राजकीय दुटप्पीपणाचे दर्शन घडविणारी असल्याचे त्यांनी नमूद केले. ईव्हीएमच्या मुद्द्यावरही काँग्रेसकडून वारंवार शंका उपस्थित केल्या जात असल्याचे सांगत, सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमसंदर्भात दिलेल्या निर्णयाचा उल्लेख त्यांनी केला. निवडणूक प्रक्रियेबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याऐवजी घटनात्मक संस्थांच्या कार्यपद्धतीबाबत वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे चर्चा व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.


