आपला जिल्हाताज्या घडामोडी

आरमोरी येथील दुर्गोत्सव पाहण्यासाठी गावी घेऊन जाण्याची मागणी; पालकांनी नाकारल्याचा संताप अनावर आश्रम शाळेतील ८ व्या वर्गातील मुलीची फाशी लावून आत्महत्या

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.१२ आक्टोंबर 

पालक सभेसाठी आश्रम शाळेत आलेल्या आई – वडिलांना आरमोरी येथील दुर्गोत्सव पाहण्यासाठी गावी घेऊन जाण्याची मागणी केली. ती मागणी पालकांनी नाकारल्याचा संताप अनावर झाल्याने आश्रम शाळेतील ८ व्या वर्गातील मुलीने पालक गावी जाताच आश्रमशाळेच्या वसतीगृहातील तिसऱ्या मजल्यावरील खोलीत पंख्याला ओढणी बांधून फाशी लावून आत्महत्या केली. ही दुर्दैवी आणि धक्कादायक घटना कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील आश्रमशाळेत सोमवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.

रानू क्रिष्णा हलामी असे आत्महत्या केलेल्या चौदा वर्षीय मुलीचे नाव आहे. ती सोनसरी पासून तीन किमी अंतरावर असलेल्या मोहगाव येथील रहिवासी होती.

प्राप्त माहितीनुसार सोमवारी आश्रम शाळेत पालक सभा होती. त्यासाठी आई वडील आश्रमशाळेत आले होते. दरम्यान रानु आई वडिलांना भेटायला आली आणि तिने आरमोरी येथील दुर्गादेवीचा दहा दिवसीय दुर्गोत्सव पाहण्यासाठी तब्येत बिघडली असल्याचे कारण सांगत घरी येण्यासाठी आग्रह धरला. आई वडिलांनी तिला समजावून सांगत दुर्गोत्सव पाहण्यासाठी काही पैसे दिले ते तिने फाडून टाकले. आणि धमकी दिली की तिला ते घरी घेऊन गेले नाही तर ती जीवाचे बरेवाईट करेल. ती मुळात तापट स्वभावाची असल्याने आई वडिलांनी फारसे गांभीर्याने घेतले नाही आणि ते ४.३० वाजताच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाले.

आई वडील परत जाताच रानुला अपमान झाल्यासारखे वाटले आणि तिचा संताप अनावर झाला.तिने आश्रमशाळेच्या वसतीगृहातील तिसऱ्या मजल्यावरील आपल्या खोलीत जाऊन दार बंद केले आणि पंख्याला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. अशी माहिती आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच आश्रमशाळेतील प्रशासनाने तातडीने पोलिसांशी संपर्क साधून त्यांना पाचारण केले. मुलीच्या पालकांना सुचना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कुरखेडा पोलीस ठाण्याच्या अधिकारी जगताप यांनी ताफ्यासह सोनसरी आश्रमशाळा गाठली. घटनेची नोंद करीत मृतदेह खाली उतरवून त्याचा पंचनामा केला.आणि पुढील कारवाई सुरू केली.
या दुर्दैवी आणि धक्कादायक घटनेमुळे कुरखेडा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!