विशेष वृतान्त

गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव अनिल हिरेखण यांच्या शैक्षणिक पात्रतेची चौकशी करा 

आठ सिनेट सदस्यांचे कुलगुरूंकडे निवेदन

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.१८ ऑक्टोबर 

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांच्या शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि पीएच.डी. पदवीसंदर्भात प्रश्न उपस्थित करीत त्यांच्या नियुक्तीशी संबंधित कागदपत्रांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी आठ सिनेट सदस्याकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन सादर करण्यात आले असून, चौकशी पूर्ण होईपर्यंत योग्य प्रशासकीय कार्यवाही करावी, अशीही मागणी केली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, डॉ. अनिल हिरेखण यांनी यापूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सहायक कुलसचिव पदावर काम केले होते. या पदासाठी आवश्यक पात्रता, नियुक्तीच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे तसेच संबंधित अनुभवाच्या नोंदींची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

डॉ. हिरेखण यांच्या सुमन मोटर्स येथील कथित कामाच्या अनुभवासंदर्भातील कागदपत्रे, एमबीए पदवीसाठीच्या अभ्यासक्रमाचा कालावधी आणि पीएच.डी. पदवीच्या वैधतेबाबतही निवेदनात शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. त्यांच्या पीएच.डी. प्रबंधासंदर्भात साहित्य चौर्याच्या कथित आरोपांची तसेच संबंधित पदवी तत्कालीन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या  नियमांनुसार प्राप्त झाली आहे किंवा नाही, याची नियमानुसार तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनकर्त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे आणि नियुक्तीविषयक अभिलेखांची पडताळणी करावी, अशी मागणी केली आहे. चौकशीदरम्यान आवश्यकतेनुसार संबंधित वरिष्ठ शैक्षणिक व प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, तसेच नियमांचे उल्लंघन आढळल्यास नियमानुसार पुढील कारवाई करावी, असे म्हटले आहे.
चौकशीत आरोपांना पुष्टी मिळाल्यास संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध नियमानुसार फौजदारी कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाने योग्य दखल न घेतल्यास राज्यस्तरावर आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनकर्त्यांनी दिला आहे.
या निवेदनावर प्रशांत दोंतुलवार, गुरुदास  कामडी, यश बांगडे, संजय रामगिवार, धर्मेंद्र ज्ञानदेव मुनघाटे, स्वरुप तारगे, सतीश ए. चिचघरे, सुहास  हुनगे आणि हर्षद गंधेवार यांनी लेखी निवेदनाद्वारे मा. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्याकडे केली आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!