विशेष वृतान्त

अहेरी नगरपंचायतचे स्वीकृत सदस्य, भाजप नेते अमोल गुडेल्लीवार यांना १ लाख २० हजाराची लाच घेताना एसीबी कडून अटक

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १५ आक्टोंबर 

अहेरी नगरपंचायत चे स्वीकृत नगरसेवक तथा भारतीय जनता पक्षाचे अहेरी येथील नेते अमोल विलासराव गुडेल्लीवार यांना गुरुवारी दुपारी इलेक्ट्रिकल ठेकेदाराकडून १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडून अटक केली आहे. ही कारवाई गोंदिया येथील भ्रष्टाचार निर्मूलन पथकाने केली आहे. यामुळे अहेरी येथे मोठी खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार तक्रारदार हे इलेक्ट्रिकल ठेकेदार चे काम करतात त्यांचे ठेकेदारी फर्म आहे व त्याबाबत त्यांच्याकडे ठेकेदारी करण्याबाबतचा परवाना आहे तसेच अहेरी येथे इलेक्ट्रिक दुकान आहे. तक्रारदार यांच्या मित्राचे सुद्धा ठेकेदारीचे फर्म आहे त्या फार्मला नगरोत्थान योजना सन २०२५+२६ मध्ये अहेरी येथील प्रभाग क्रमांक एक ते दहा मध्ये ९,९३,९०९ रुपयांची मंजूर निविदा व प्रभाग क्रमांक ११ ते १७ मध्ये ९९३८५६ रुपयांची मंजूर निविदा असे एकूण १९८७७६५ रुपयांचे अतिरिक्त सर्विस केबल टाकण्याचे काम मिळाले होते. यातील प्रभाग क्रमांक ११ ते १७ चे काम करारनामा करून तक्रारदार यांनी पूर्ण केले आहे. १ ते १० प्रभागाचे काम करणारे ठेकेदार हे तक्रारदार यांचे मित्र असल्याने त्यांच्या कामासोबतच प्रभाग क्रमांक १ ते १० च्या कामावर तक्रारदार हे देखरेख ठेवत होते. दोन्ही कामांचे कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर तक्रारदार यांनी विहित मुदतीत काम पूर्ण केले. सदर दोन्ही कामाचे संपूर्ण बिल निघाले आहे. बिल निघाल्यानंतर नगरपंचायत अहेरी येथील नगरसेवक अमोल गुडेलीवार यांनी तक्रारदार यांच्या दुकानांमध्ये येऊन त्यांना भेटून, अहेरी येथील इलेक्ट्रिकल ठेकेदार यांना सदर कामे जिल्हा नियोजन समितीकडून मी मंजूर करून आणले असून ते आमच्या कोट्यातील आहेत. त्यामुळे मंजूर झालेल्या बिलाची रक्कम १९८७७६५ रुपयांपैकी, मोबदला म्हणून एकूण बिलाचे १५ टक्के प्रमाणे तीन लाख रुपये मला दे अशी वारंवार लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार यांनी नाईलाज म्हणून ५ ऑगस्ट रोजी आरोपीला ३० हजार रुपये रोख दिले होते. तरी पण आरोपीनेतक्रारदाराच्या व्हाट्सअप वर कॉल करून उर्वरित २ लाख ७० रुपये लाचेची मागणी करत होते तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे त्याबाबत तक्रार दिली.

तक्रारची पडताळणी केली असता आरोपीने तक्रारदार यांना तक्रारीत नमूद असल्याप्रमाणे २ लाख ७० रुपये लाचेची मागणी केली व आता जमतील तितके पैसे थोड्या वेळात आणून देण्यास सांगितले त्यावेळी तक्रारदार यांनी त्यांच्याकडे सध्या १ लाख २० हजार रूपये उपलब्ध असल्याचे सांगितले असता आरोपीने थोड्या वेळात हार्डवेअरच्या दुकानावर आणून देण्यास सांगितले.

एसीबी च्या पथकाने तक्रारदाराला व्हॉइस रेकॉर्ड व पंचासह लाच रक्कम घेऊन गैरअर्जदार यांच्या हार्डवेअरच्या दुकानात पाठवले असता गुडेल्लीवार यांनी तक्रारदाराकडून १ लाख २० हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना गुडेल्लीवार यांना रंगेहात पकडले. आरोपी अमोल गुडेल्लीवार यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन अहेरी येथे गुन्हा दाखल करुन आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

सदर कारवाई दिंगबर प्रधान, पोलीस अधीक्षक, माधुरी बाविस्कर, अपर पोलीस अधीक्षक, विजय माहुलकर, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी, पोलीस निरीक्षक अरविंद राऊत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत करपे, हेडकॉन्स्टेबल संजयकुमार बोहरे, मंगेश कहालकर, संतोष शेंडे, संतोष बोपचे, प्रशांत सोनवणे, दिपक बाटबर्वे यांच्या पथकाने केली

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!