विशेष वृतान्त

जमीन अधिग्रहणासहित शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर १ डिसेंबरला गडचिरोली ते नागपूर पायी मोर्चा

विधिमंडळाच्या अधिवेशनावर बैलगाड्यांसह धडकणार शेकडो शेतकरी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १८ ऑक्टोबर 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना जमीन अधिग्रहणासह शेती, सिंचन, वीजपुरवठा, पीक नुकसानभरपाई, आरोग्य सुविधा आणि रोजगाराचे प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी साखळी उपोषणासह अनेक आंदोलन केले. परंतु सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अधिक तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. जमीन अधिग्रहणाचे आदेश रद्द करण्यासह इतर अनेक मागण्यांसाठी येत्या १ डिसेंबर रोजी गडचिरोली ते नागपूर पायी मोर्चा काढण्यात येणार असून, ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान बैलगाड्यांसह नागपूर येथे आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असल्याची माहिती शेतकरी नेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.

जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या राज्याच्या महसूल मंत्र्यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मात्र, जिल्ह्यात जमीन अधिग्रहणाच्या विरोधात शेतकरी साखळी उपोषण करीत असताना आंदोलनस्थळी भेट देऊन समस्या जाणून घेण्याची तसदी का घेण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित केला.

जमीन अधिग्रहणाविरोधात शेतकरी आक्रमक

गडचिरोली जिल्ह्यात विविध विकास प्रकल्पांसाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया राबविली जात असताना शेतकऱ्यांकडून त्याला विरोध केला जात आहे. सुपीक आणि बहुपीक जमिनी अधिग्रहित केल्यास शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अशा जमिनींचे अधिग्रहण टाळून प्रकल्पांसाठी पर्यायी जागांचा विचार करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. जमीन अधिग्रहणासंदर्भातील निर्णय घेताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे, त्यांच्या संमतीचा आणि हिताचा विचार करावा तसेच अन्यायकारक वाटणारे अधिग्रहणाचे आदेश रद्द करावेत, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे.

दुष्काळग्रस्त यादीत उर्वरित दहा तालुक्यांचा समावेश करा, धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रलंबित बोनस तातडीने वितरित करावा, कृषिपंपांसाठी नियमित आणि अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावी, वाघ आणि रानटी हत्तींच्या वावरामुळे शेतकरी धास्तावले असल्यामुळे वन्यप्राण्यांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, आरोग्य, रोजगार आणि रस्त्यांच्या समस्यांकडेही लक्ष द्यावे, जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना स्थानिक उद्योग आणि आस्थापनांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. इत्यादी मागण्यांचा समावेश आहे.

सदर पायी मोर्चा १ डिसेंबरपासून गडचिरोली येथून सुरू होऊन ७ डिसेंबरला विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धडक देईल.

पत्रकार परिषदेत शेतकरी नेते तथा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, काँग्रेस नेते प्रभाकर वासेकर, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल कोठारे, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, दिवाकर निसार यांच्यासह शेतकरी बांधव, काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!