विशेष वृतान्त

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लहाडे यांच्यावरील निलंबनाची कारवाई राजकीय दबावातून ? पारदर्शक चौकशी करा – आसपा

२.६२ कोटींच्या विशेषज्ञ मानधनाचे आणि सीझेरीयन प्रसुतीचे स्वतंत्र ऑडिट करा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १९ सप्टेंबर 

गडचिरोली जिल्ह्यातील महिला व बाल रुग्णालयातील माता-बाल मृत्यूच्या घटनांनी जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने १६ सप्टेंबर रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांना निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. शासनाच्या कारवाईत त्यांच्या पर्यवेक्षकीय जबाबदारीतील निष्काळजीपणा, दुर्लक्ष आणि कर्तव्यात कसूर केल्याचा उल्लेख आहे. मात्र लहाडे यांना वेगळा न्याय कां, कोणत्याही चौकशी शिवाय निलंबन कां, इतर प्रकरणात आधी चौकशी, नंतर कारवाई होत आहे. मग या प्रकरणात वेगळा निकष कां, डॉ. लहाडे यांना एकट्याला माता-बाल मृत्यूंसाठी जबाबदार ठरवणे योग्य कसे? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करीत डॉ. वर्षा लहाडे यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईची स्वतंत्र निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष राज बन्सोड यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेतून केली आहे. तत्पूर्वी त्यांनी या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि संबंधिताना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केली आहे.

गडचिरोलीत झालेल्या तीन माता व बाल मृत्यू प्रकरणांचा आधार घेत डॉ.लहाडे यांचे निलंबन केले गेले असल्याचे सांगितले जात असले तरी त्यामागील पार्श्वभूमी वेगळी आहे. असे बन्सोड यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की याप्रकरणी सत्ताधारी पक्षाच्या एका लोकप्रतिनिधीचा दबाव कारणीभूत ठरला. त्यांनी संबंधित लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपाला विरोध केल्यामुळे किंवा त्यांच्या कथित बेकायदेशीर कामांना सहकार्य न केल्यामुळे डॉ. लहाडे यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच माता बाल मृत्यू प्रकरणी डॉ.लहाडे यांनी वस्तुस्थिती दर्शक कारवाई प्रस्तावित करुन दोषींवर ठपका ठेवला आहे. ते संबंधित डॉक्टर आणि जिल्ह्यातील रुग्णालयात सीझर डिलीव्हरी वर नियंत्रण आणून सामान्य डिलिव्हरी साठी डॉक्टरांना बाध्य केले. परिणामी डॉक्टरांचे मानधन कमी झाले त्याही डॉक्टरांनी लहाडे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. उल्लेखनीय आहे की डॉ.लहाडे यांनी जिल्ह्यातील रुग्णालयात होणाऱ्या सीझरीन प्रसुतीच्या मनमानी कारभाराला लगाम लावला. आणि सामान्य प्रसूतीची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून डॉक्टरांचे लाखो रुपयांचे मानधन कमी होऊन शासनाचे अनावश्यक खर्च होणारे पैसे वाचविले. त्यामुळे संबंधित डॉक्टरांनी वर्षा लहाडे यांच्या कार्यपद्धतीवर आरोप करणे सुरू केले. असेही राज बन्सोड यांनी सांगितले.

या प्रकरणी माता-बाल मृत्यूंची स्वतंत्र उच्चस्तरीय वैद्यकीय चौकशी करावी. चामोर्शी व गडचिरोलीतील सर्व संबंधित प्रकरणांचे एकत्रित क्लिनिकल ऑडिट करावे. प्रत्यक्ष उपचार करणाऱ्या डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांची भूमिका निश्चित करावी. २.६२ कोटींच्या विशेषज्ञ मानधनाचे स्वतंत्र आर्थिक ऑडिट करावे.सीझरच्या संख्येत झालेल्या बदलाचे स्वतंत्र वैद्यकीय ऑडिट करावे. सीझर आणि नार्मल डिलीव्हरी संदर्भातील निर्णयांवर आर्थिक प्रोत्साहनाचा परिणाम होतो का, याची चौकशी करावी. डॉ. वर्षा लहाडे यांच्यावरील आरोप चौकशीत सिद्ध झाल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी. माता-बाल मृत्यू प्रकरणात इतर कोणाचीही वैद्यकीय किंवा प्रशासकीय चूक सिद्ध झाल्यास त्यांच्यावरही तातडीने कारवाई करावी. अशी मागणी केली आहे.

पत्रकार परिषदेला आजाद समाज पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा प्रभारी विनोद मडावी, नागसेन खोब्रागडे, विवेक खोब्रागडे, प्रेम मडावी, प्रतिक डांगे, सतीश दुर्गमवार, सुरेंद्र वासनिक, नितेश वेस्कडे उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!