पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकाची नक्षल्यांनी केली हत्या
पोलीस मदत केंद्राजवळ मृतदेह फेकला ; भामरागड तालुक्यातील घटना
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १० ऑगस्ट
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका युवकाची नक्षल्यांनी गोळी झाडून हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्रो भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलीस स्टेशन हद्दीतील लाहेरी टोला येथे घडली. नक्षल्यांनी हत्येनंतर मृतदेह लाहेरीच्या पोलीस मदत केंद्राजवळ आणून टाकला. किशोर कुडयामी (२३) रा. लाहेरी टोला असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.
गडचिरोली जिल्ह्यात नक्षल सप्ताह दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडली नाही. मात्र, मंगळवारी आदिवासी दिवशी नक्षल्यांनी लाहेरी टोला येथील किशोर कुडयामी या युवकाच्या घरी जाऊन त्याच्या छातीत गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह लाहेरीच्या पोलीस मदत केंद्राजवळ आणून टाकला. किशोर कुडयामी हा काही दिवसांपूर्वी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेण्यासाठी गडचिरोली येथे गेला होता, तोच राग ठेऊन नक्षल्यांनी त्याची हत्या केल्याचे बोलले जात आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.