क्राईम स्टोरीविशेष वृतान्त

बदल्याची आग आणि संपत्तीच्या लालसेपोटी दोघींनी थंड डोक्याने केल्या सहा हत्या

गडचिरोली जिल्हा हादरला; पोलिसांनी तीन दिवसांत सत्य उजेडात आणले

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १८ आक्टोंबर

घरच्यांचा विरोध असतानाही लग्न केले आणि त्यातून वडीलांनी आत्महत्या केली. त्याच्या बदल्याची आग आणि दुसऱ्या एका नातेवाईकेचे संपत्तीच्या लालसेपोटी वाटणीतील वाटेदारच संपवून टाकण्याची मनीषा यातून दोघी एकत्र येऊन संपूर्ण कुटुंबच संपविण्याचा घाट घातला. आणि थंड डोक्याने,  नियोजनबद्ध काम करत रंगहीन, पाण्यात विरघळणारे विष ज्याचा हळूहळू परिणाम होतो, ते वेगवेगळ्या वेळी जेवणातून आणि पाण्यातून देत सहा जणांची निघृण हत्या केली.  उल्लेखनीय आहे की मागील आठवड्यात कोरची तालुक्यातील दवंडी येथे ११ आक्टोंबर रोजी एका महिलेने थंड डोक्याने विचार करीत, अवैध प्रेमसंबंधात पतीचा अडसर दूर करण्यासाठी  प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने पतीची गळा चिरून हत्या केली. एकीकडे मागास आणि अशिक्षित समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या या दोन्ही हत्यांनी जिल्हा हादरून गेला आहे.

मागील काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव येथील रहिवासी शंकर पिरु कुंभारे यांचेसह त्यांचे परिवारातील चार व्यक्तींचा अवघ्या वीस दिवसाचे कालावधीत अचानक आजारी पडुन मृत्यु झाल्याने त्या परिसरात भितीचे व संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणाचा तात्काळ तपास करुन तीन दिवसात ही भूतबाधा नसून दोन महिलांनी एकत्र येऊन थंड डोक्याने नियोजनबद्ध पद्धतीने केलेली हत्या असल्याचे सत्य समोर आणले आणि आरोपींना जेरबंद केले.

२० सप्टेंबर रोजी शंकर कुंभारे व त्यांची पत्नी विजया  यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना अहेरी व त्यानंतर चंद्रपूर व शेवटी नागपूर येथील नामांकित रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. परंतु २६ सप्टेंबर रोजी शंकर कुंभारे व २७ सप्टेंबर रोजी त्यांच्या पत्नी सौ. विजया यांचा लागोपाठ दोन दिवसात मृत्यु झाला. त्या धक्यातुन सावरत असतांना अचानक गडअहेरी येथे राहणारी त्यांची मुलगी कोमल दहागावकर व मुलगा रोशन कुंभारे यांची तसेच शंकर कुंभारे यांची मुल येथे राहणारी साळी आनंदा ऊर्फ वर्षा उराडे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात भरती करण्यात आले. अनेक औषध उपचार करुन देखील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न होता दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यामध्ये ८ आक्टोंबर रोजी कोमल दहागावकर, १० आक्टोंबर आनंदा ऊर्फ वर्षा उराडे व १५ आक्टोंबर ला रोशन कुंभारे याचा मृत्यु झाला.

आई वडील उपचारासाठी रुग्णालयात भरती असल्याची माहिती मिळताच शंकर कुंभारे यांचा दिल्ली येथे नोकरी निमित्य वास्तव्यास असलेला मोठा मुलगा सागर कुंभारे हा चंद्रपूर येथे आला असता, आई वडीलांच्या मृत्युनंतर तो दिल्ली येथे परत गेल्यावर अचानक त्याची प्रकृती बिघडल्याने त्यास उपचारासाठी दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याचप्रमाणे शंकर कुंभारे व विजया कुंभारे यांना अहेरी येथुन चंद्रपूर येथे उपचारासाठी नेणारा त्यांच्या कारचा चालक राकेश मडावी याची देखील दुसऱ्या  दिवशी पासुन प्रकृती बिघडल्याने त्याला देखील चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. तसेच नातलग भरती असल्याने त्यांना मदतीच्या उद्देशाने शंकर कुंभारे यांच्या साळीचा मुलगा चंद्रपूर व नागपूर येथे आल्याने त्याची देखील प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. यातील एकाचा मृत्यू झाला असल्याचे समजते.

एकाच परिवारातील पाच व्यक्तींच्या अल्पावधीत झालेल्या गुढ मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरुन भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे एसपी नीलोत्पल यांनी विशेष तपास यंत्रणेच्या माध्यमातून तपास सुरू केला. तपास यंत्रणेने तात्काळ वेगवेगळे चार तपास पथक गठीत करुन त्यांची परिसरातील गोपणीय यंत्रणा सक्रिय करुन महाराष्ट्रातील विविध जिल्ह्रात तसेच तेलंगणा राज्यात तपास करुन गुन्हा उघडकिस आणण्याचे प्रयत्न सुरु केले असतांना, परिसरातील गोपनीय सुत्रांकडुन गावात शंकर कुंभारे यांची सुन संघमित्रा कुंभारे व साळ्याची पत्नी रोझा रामटेके यांचा गुन्ह्रात सक्रिय सहभाग असल्याचे माहिती मिळाली. त्यावरुन त्या दोघींच्याही हालचालींवर पोलीसांनी बारकाईने लक्ष ठेवुन त्यांना १८ आक्टोंबर, बुधवारी ताब्यात घेवुन सखोल विचारपुस केली असता, त्या दोघींनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्ह्राचा सखोल तपास केला असता, आरोपी संघमित्रा कुंभारे हिने रोशन कुंभारे याचेशी तिच्या आई वडीलांच्या विरोधात जावुन लग्न केले व या कारणामुळे तिच्या वडीलांनी आत्महत्या केली. याबाबत पति रोशन व सासरचे मंडळी तिच्या माहेरच्या लोकांच्या नावे वारंवार टोमणे मारत असत, तसेच सह आरोपी रोझा रामटेके हिने सासऱ्याच्या नावे असलेल्या शेतजमिनीत शंकर कुंभारे यांची पत्नी विजया कुंभारे व तिच्या इतर बहिणी हिस्सा मागुन नेहमी वाद करित असल्याच्या कारणावरुन त्या दोघींनी संपुर्ण कुंभारे परिवार व त्यांचे नातलागांना विष देवुन जिवे ठार मारण्याची योजना आखली. त्या योजनेप्रमाणे रोझा रामटेके हिने तेलंगणा राज्यात जावुन विष आणले व ते विष जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्या दोघींनी मृतकांच्या व आजारी व्यक्तींच्या खाण्यापिण्याच्या वस्तुंमध्ये मिसळुन त्यांना खाण्यास दिल्याने त्या विषाचा हळुहळु परिणाम होवुन त्या सर्व व्यक्ती एका पाठोपाठ आजारी पडण्यास सुरवात झाली व त्यात पाच व्यक्तींचा मृत्यु झाला. राकेश मडावी हा शंकर कुंभारे यांचे परिवारातील नव्हता परंतू तो त्यांच्या गाडीतील पिण्याच्या पाण्याच्या बॉटलमधील पाणी पिल्याने विषबाधा होवुन तो आजारी पडला. त्याचाही मृत्यू झाल्याचे समजते.

सदर घटनेच्या अनुषंगाने अहेरी पोलीस स्टेशन येथे अप क्र. 374/2023 कलम 302, 307, 328, 120 (ब) व 34 भादवि अन्वये गुन्हा नोंद केला. दोन्ही  आरोपींना बुधवार दिनांक १८ आक्टोंबर ला अटक करण्यात आली. गुन्ह्इयात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!