आपला जिल्हा

गडचिरोली जिल्ह्याला पुराचा फटका ; मागील पंधरा दिवसात १४ जणांचा मृत्यू तर ८२११ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान

सिरोंचा व भामरागड तालुक्यात सर्वाधिक नुकसान

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १७ जुलै

गडचिरोली जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून संततधार पाऊस सुरु असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे मागील पंधरा दिवसात एकूण १४ जणांचा मृत्यू झाला तर ६१ जनावरे दगावली आहेत. तसेच ७६८ घरांची पडझड झाली असून ८२११ हेक्टर आर. क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. सोमवार पासून जलद गतीने नुकसानीचे पंचनामे सुरु केले जाणार असून ही आकडेवारी वाढणार असल्याचे प्रशासनिक सूत्रांनी म्हटले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडवला आहे. शुक्रवारी व शनिवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यामुळे बंद असलेल्या काही मार्गावरून वाहतूक सुरु झाली होती. मात्र, शनिवारी रात्रीपासून जिल्हाभर जोरदार पावसाने हजेरी लावली असून पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी दुसऱ्यांदा भामरागड गावात शिरले आहे. त्यामुळे गावातील अनेक घरे तसेच दुकाने पाण्याखाली गेली आहेत. पुराचा फटका सर्वाधिक सिरोंचा व भामरागड तालुक्याला बसला असून सिरोंचा तालुक्यातील ३५१९ हे.आर. तर भामरागड तालुक्यातील २०९३ हे.आर. क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. तर सिरोंचा येथील १४० व भामरागड तालुक्यातील एकूण ३४० घरांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी संजय मीना यांनी सिरोंचा येथील पूरबाधित भागाला भेट देऊन पूरग्रस्तांसोबत चर्चा केली व तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले.

गडचिरोली जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे भामरागड तालुका मुख्यालयाला लागून असलेल्या पर्लकोटा नदीला पूर आला आहे. दिवसेंदिवस पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होत आहे. चारही बाजूने पुराच्या पाण्याने शहरात प्रवेश केला आहे. त्यामुळे अनेक घरे व दुकाने पाण्याखाली गेले आहेत. भामरागडचा तीन दिवसाआगोदर संपर्क तुटला होता. शुक्रवारी व शनिवारी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पर्लकोटा नदीवरून रहदारी सुरु झाली होती. परत आता भामरागडचा संपर्क तुटलेला आहे. पुराच पाणी भामरागड शहरात शिरले असून व्यापारी वर्ग आपले आपले जीवनावश्यक सामान, साहित्य सुरक्षित ठिकाणी स्थानांतरण करीत आहेत.

सिरोंचा तालुक्यात अजूनही पूरपरिस्थिती असून २३ जुलै पर्यंत तालुक्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तर इतर तालुक्यातील शाळा, महाविद्यालये सुरु करण्याचे निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

जिल्ह्यात शनिवारी पासून सुरु असलेल्या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून पुन्हा पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड-आलापल्ली मार्ग व दिना नदीवरुन पुन्हा पाणी वाहत असल्याने आलापल्ली ते आष्टी मार्ग बंद आहे. तसेच चामोर्शी-गडचिरोली, अहेरी बेजुरपल्ली-पर्सेवाडा, देवलमरी- अहेरी, सोमनपल्ली जवळील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे  निझामाबाद सिरोंचा जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग तसेच भामरागड, लाहेरी बिनगुंडा राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. सिरोंचा तालुक्यातील बोरमपल्ली ते नेमडा, कंबालपेठा ते टेकडा चेक आणि पर्सेवाडा-चिकेला- जाफराबाद येथील नाल्यावरील रपटे वाहून गेल्याने सदर मार्ग पूर्णतः बंद आहेत. तर पाणी ओसरल्याने आलापल्ली ते सिरोंचा व आष्टी ते चंद्रपूर मार्ग हलक्या वाहनांकरिता सुरू करण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची सिरोंचा तालुक्यातील पूरबाधित भागाला भेट

जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे दहा हजाराहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. पिके पाण्याखाली आली, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या सर्व नुकसानीचा सर्वे करून तातडीने पंचनामे करावेत असे आदेश जिल्हाधिकारी संजय मीना यांनी तालुका प्रशासनाला दिले.
पूरबाधित क्षेत्रात प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असून याचा आढावा घेण्यासाठी व पूरबाधित क्षेत्राची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सिरोंचा येथे भेट दिली. यावेळी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी फरेन्द्र कुतीरकर, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थापन प्राधिकरण कृष्णा रेड्डी उपस्थित होते.
जलजन्य आजार, साथरोग रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून गावातील पाण्याचे स्त्रोत निर्जंतुक करून आरोग्यविषयक गावोगावी तपासण्या करण्यात यावे तसेच गरोदर मातांची तपासणी करून विशेष काळजी घेण्याचे सूचनाही आरोग्य विभागाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!