गडचिरोलीत ४ दुकानातून ३०७ किलो प्लास्टिक जप्त ; १० हजाराचा दंड वसूल
महिनाभरात १३८ किलो प्लास्टिक जप्त, ५५ हजाराचा दंड वसूल
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०२ ऑगस्ट
देशात १ जुलैपासून पॅकेजिंग करण्याकरीता ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या व एकल वापराच्या १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेले प्लास्टिक वापरावर बंदी घातली असली तरी गडचिरोली शहरात दुकानदार या प्लास्टिकचा वापर करतात. त्यामुळे नगरपरिषदेच्या पथकाने धाडसत्र सुरु केले शहरातील ४ दुकानावर धाड टाकून ३०७ किलो प्लास्टिक व १० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच जुलै महिन्यात सुमारे १३८ किलो प्लास्टिक जप्त केले आहे. तसेच ५५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या व एकल वापराच्या १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेले प्लास्टिक वापरावर तसेच प्लास्टिकच्या काड्या असलेले इयर बड्स, फुग्यांसाठी प्लास्टिकच्या काड्या, प्लास्टिकचे ध्वज, कँडी स्टिक्स, आइस्क्रीम स्टिक्स, सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकोल, प्लेट्स, कप, ग्लासेस, चमचे, चाकू, ट्रे, मिठाईचे खोके, निमंत्रण पत्रिका आणि सिगारेटची पाकिटे इत्यादीवर बंदी घालण्यात आली आहे. १ जानेवारी २०२३ पासून २२० मायक्रॉनपेक्षा खालच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात येणार आहे.
नगर परिषद गडचिरोली येथील प्लास्टिक बंदी पथकांद्वारे नियमितपणे शहरातील विविध ठिकाणी भेटी देऊन किरकोळ विक्रेते व मोठ्या व्यापाऱ्यांकडून एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात येत आहे. सोमवारी शहरातील रेड्डी गोडाऊन चौक येथील एक, गोकुलनगर येथील दोन व मूल मार्गावरील गौरव पेट्रोलपंप जवळील एका दुकानावर धाड टाकून ३०७ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच १० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभाग प्रमुख रवींद्र भंडारवार यांच्या नेतृत्वात पथक प्रमुख नितेश सोनावणे, निकेश गहाणे, अशोक पारधी, शामराव खोब्रागडे, अशोक गेडाम यांनी सोमवारी कारवाई केली.