चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १३ जणांचा मृत्यू तर १३२३९.१५ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क चंद्रपूर दि १७ जुलै
चंद्रपुर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १ ते १६ जुलै दरम्यान १३ जणांचा मृत्यू झाला आहे तर ४० जनावरे दगावली आहेत. तसेच १३२९ घरांची पडझड झाली असून १३२३९.१५ हेक्टर जमीन पाण्याखाली आल्याने पिकांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.
जिल्ह्यातील इरई धरण, गोसेखुर्द धरण व अप्पर वर्धा धरणाचे तसेच सर्वच धरणाचे दरवाजे उघडले गेले. यामुळे जिल्ह्यात सर्वदूर पूर परिस्थिती निर्माण झाली. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक नदी, नाले ओसंडून वाहू लागले, अनेक घरात पाणी घुसले, काही पुरात वाहून गेले, तर काही जखमी झाले. प्रशासनाने शक्य तितक्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका भद्रावती, कोरपना व राजूरा तालुक्याला बसला असून भद्रावती तालुक्यात ३८०० हेक्टर, कोरपना ४९४६ हेक्टर व राजुरा तालुक्यातील ४४५८ हेक्टर जमीन पाण्याखाली आल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच भद्रावती तालुक्यात ३७२ घरांची पडझड झाली तर कोरपना येथ १७३ व राजुरा येथे १६२ घरांचे नुकसान झाले आहे.