
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १८ जुलै
गडचिरोली जिल्ह्यात सोमवारीही पावसाने थैमान घातले. मागील २४ तासात जिल्ह्यात सरासरी १०७.८ मि.मी. पाऊस पडला असून १ जून ते १८ जुलैपर्यंत अपेक्षित सरासरीच्या १८३.९ टक्के म्हणजेच ८४४.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पुढील ४८ तास जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा महाविद्यालय, खाजगी आस्थापने बंदच्या निर्णयाला २० जुलै पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
मागील २४ तासात जिल्हाभर जोरदार पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यातील ८ तालुक्यात शंभराहून अधिक मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यात सर्वाधिक १५६.५ मिमी पाऊस गडचिरोली तालुक्यात पडला आहे. तर कुरखेडा १०३.५ मिमी, आरमोरी ११४.४ मिमी, चामोर्शी ११८.९ मिमी, सिरोंचा ४३.८ मिमी, अहेरी ७६.६ मिमी, एटापल्ली १३४.९ मिमी, धानोरा ११४.४ मिमी, कोरची ८२.१ मिमी, देसाईगंज १३४ मिमी, मुलचेरा ८१ मिमी व भामरागड तालुक्यात १३३.९ मिमी पाऊस झाला.
दहा दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. त्यामुळे सिरोंचा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच पर्लकोटा नदीचे पाणी भामरागड तालुकास्थळी शिरल्याने तालुक्यातील शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील सर्वच नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. तसेच खबरदारी म्हणून ७ गावातील २८५ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. भामरागड तालुका व छत्तीसगड राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी वाढून पुराचे पाणी भामरागडात शिरले आहे. शेकडो घरे, दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
सोमवारीही पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड-आलापल्ली मार्ग व चामोर्शी-गडचिरोली, अहेरी बेजुरपल्ली-पर्सेवाडा, देवलमरी- अहेरी, भामरागड, लाहेरी बिनगुंडा राष्ट्रीय महामार्ग बंद आहे. सिरोंचा तालुक्यातील बोरमपल्ली ते नेमडा, कंबालपेठा ते टेकडा चेक आणि पर्सेवाडा-चिकेला- जाफराबाद येथील नाल्यावरील रपटे वाहून गेल्याने सदर मार्ग पूर्णतः बंद आहेत. जिल्ह्यात २८ मार्ग बंद सोमवारी बंद झाले आहेत.
बोटीच्या सहाय्याने रुग्णाला दाखल केले रुग्णालयात
जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून गडचिरोली तालुक्यातील शिवणी ते चामोर्शी व गुरुवाळा मार्ग नाल्यावरून पाणी वाहत असल्याने बंद आहे. गडचिरोली तालुक्यातील कुंभी मोकासा येथील आनंदराव मेश्राम या डायलोसिसच्या रुग्णाला तातडीने दवाखान्यात भरती करण्याची गरज भासली. मात्र, मार्ग बंद असल्याने रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रश्न निर्माण झाला होत. आरोग्य विभागाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क साधला असता पोलिसांच्या एमटीएस च्या बचाव पथकाने बोटीच्या सहाय्याने रुग्णाला सुखरूप जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करून यशस्वी मोहीम राबविली.
पुरात अडकलेल्या दोघांना सुखरुप बाहेर काढले
रविवारी माडेमूल येथील मृतदेह पोहचवून परत येत असतांना रानमूल व माडेमूल मधील नाल्यावर पाण्याची पातळी वाढल्याने ॲम्बूलन्स चालक यशवंत गुणाजी कांबळे व सहायक वैभव नंदेश्वर हे दोघेही पुरात अडकले होते. माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन (पोलीस दल) व राज्य आपत्ती प्रतिसादर टीमने घटनास्थळी पोहोचून सदर युवकांना सुखरूप बाहेर काढले.