उद्या देशातील ५०० अमृत भारत रेल्वे स्टेशन्सचे पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन; गडचिरोली जिल्ह्यातील वडसा (देसाईगंज) रेल्वे स्टेशनचा समावेश
वडसा ( देसाईगंज ) रेल्वे स्टेशन वर खा. नेतेंच्या उपस्थितीत प्रत्यक्ष भूमिपूजन सोहळा; नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ५ ऑगस्ट
देशातील स्मार्ट सिटीच्या तत्वावर भारताच्या अमृत महोत्सवी वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० अमृत भारत रेल्वे स्टेशन्सची घोषणा केली. या अमृत भारत रेल्वे स्टेशन्सच्या भूमिपूजनाचा ऑनलाईन सोहळा उद्या ६ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात येत आहे. या ५०० स्टेशन्समध्ये गडचिरोली लोकसभेतील आणि जिल्ह्यातील वडसा (देसाईगंज) आणि आमगाव या रेल्वे स्टेशन्सचा समावेश असुन वडसा (देसाईगंज) येथे खा. अशोक नेते यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खा. नेते यांनी गडचिरोली येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेतून केले आहे.
वडसा (देसाईगंज) हे गडचिरोली जिल्ह्यातील एकमात्र रेल्वे स्टेशन आहे. पंतप्रधान मोदींनी भारताच्या अमृत महोत्सवी वर्षात छोट्या – छोट्या रेल्वे स्टेशन्सचे दर्जोन्नतीकरण करून स्मार्ट रेल्वे स्टेशन बनविण्याचे धोरण राबवित अमृत भारत रेल्वे स्टेशन्सची घोषणा केली होती. अर्थसंकल्पात निधीही उपलब्ध करून दिला असून ऊद्याच्या भूमिपूजनानंतर या कामाला सुरुवात होणार आहे. उद्या सकाळी ९ ते १२ वाजता पर्यंत उद्घाटन सोहळा चालणार आहे. ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण होईल.
खासदार अशोक नेते यांनी सांगितले की त्यांनी दोन्ही स्टेशनचा या योजनेत समावेश व्हावा म्हणून अथक परिश्रम घेतले. त्यामुळे महाराष्ट्रातील ४४ स्टेशन्समध्ये हे स्टेशन्स स्मार्ट होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वडसा (देसाईगंज) रेल्वे स्टेशन साठी १८ कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यांनी यावेळी सांगितले की वडसा गडचिरोली रेल्वे लाईनच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी ३३२ कोटींची निवीदा निघालेली आहे. या कामाला १०९६ कोटी रुपये खर्च होणार आहे. नागभीड – नागपूर साठी १४०० कोटींचा खर्च होणार आहे. गडचिरोली – चामोर्शी – आष्टी – आलापल्ली – सिरोंचा ते आदिलाबाद, गडचिरोली – धानोरा ते भानुप्रतापपूर आणि नागभीड – कान्पा – चिमूर – वरोरा या मार्गांचेही सर्वेक्षण सुरू झाले आहेत. त्यामुळे गडचिरोली लोकसभा क्षेत्र चहूबाजूंनी रेल्वेने जोडले जाणार आहे. ही आपल्या खासदारकीच्या काळातील मोठी ऊपलब्धी आहे. यापूर्वी कांग्रेसच्या काळात रेल्वेला ११०० कोटींच्या वर निधी मिळत नव्हता परंतु मोदी सरकारने रेल्वेला ११ हजार कोटींपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यात ऊद्योगांचा विकास होण्यासाठी नो हॉलीडे पॅकेज जाहीर करावा असे पंतप्रधानच्या नुकत्याच झालेल्या भेटीत आपण विनंती केली असल्याचेही खासदार नेते यांनी आवर्जून सांगितले. पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, महामंत्री रविंद्र ओल्लालवार, गोविंद सारडा, रमेश भूरसे, सुधाकर येनगंधलवार, प्रकाश गेडाम, सदानंद कुथे, अनिल कुनघाडकर, संजय बारापात्रे यांचेसह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.