गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी पंकज गुड्डेवार यांची नियुक्ती
कांग्रेसच्या संघटनात्मक मजबुतीने आव्हान
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २४ ऑक्टोबर
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी पंकज गुड्डेवार यांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी ही नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र जाहीर केले आहे.
उल्लेखनीय आहे की एड. विश्वजीत कोवासे यांची सहा महिन्यांपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी मोठा गाजावाजा करुन अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला होता. परंतू पावसाळ्यात एड. विश्वजीत कोवासे हे सचिव असलेल्या शिक्षण संस्थेच्या जपतलाई येथील आश्रमशाळेतील तीन विद्यार्थ्यांनींचा सर्पदंशाने मृत्यू झाला. या प्रकरणी कोवासे पितापुत्रांवर गुन्हा दाखल होऊन विश्वजीत कोवासे यांना अटक झाली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत जेलमध्ये आहेत. असे असताना प्रदेश कांग्रेसने कोवासे यांना पदावरून हटविले नाही. सध्या जिल्हा कांग्रेसला वाली नसल्यामुळे आणि जिल्हा काँग्रेस ही बिना डोक्याची संस्था झाली असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील काम थंडबस्त्यात पडले होते. या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसने जिल्हा काँग्रेसला बळ देण्याच्या दृष्टीने पंकज गुड्डेवार यांची नियुक्ती केली आहे.
श्री गुड्डेवार हे काँग्रेसच्या दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयात काही काळ कार्यरत होते. त्यानंतर त्यांना ब्रह्मपूरी विधानसभेत संधी देण्यात आली होती. परंतू ते पराभूत झाले होते. त्यानंतर त्यांनी गडचिरोली येथे कांग्रेस मध्ये सक्रिय राजकारणात सहभाग घेतला. सध्या ते प्रदेश कार्यकारिणीवर सचिव म्हणुन कार्यरत आहेत.
सोफिस्टीकेटेड, व्हाईट कॉलर्ड आणि आपल्या मर्यादित कोषात असणारे नेते म्हणून पंकज गुड्डेवार यांची गडचिरोलीत ओळख आहे. महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी मागील पाच वर्षांत गडचिरोली जिल्ह्यात पायाला भिंगरी बांधून फिरत कांग्रेसचे संघटन मजबूत केले. त्याचा प्रभावही दाखवला. विश्वजीत कोवासे यांना काम करण्याची संधीच मिळाली नाही. अशावेळी पंकज गुड्डेवार यांचेकडे चालून आलेली प्रभारी अध्यक्ष पदाची संधी गडचिरोली जिल्ह्यातील कांग्रेसचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कितपत लाभदायक ठरेल याकडे पाहिले जात आहे.
पंकज गुड्डेवार यांच्या नियुक्तीचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रभारी डॉ.श्रीवल्ला प्रसाद, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी महासचिव राज्यसभा खासदार मुकुल वासनिक, गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार रामदास मसराम, माजी खासदार मारोतराव कोवासे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव रवींद्र दरेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव अजय कंकडलवार, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, नगरसेवक रमेश चौधरी, नंदू वाईलकर, संजय चन्ने, हेमंत मोहितकर, रुपेश टिकले, सुशील पाराशर, यांनी स्वागत केले आहे.



