विशेष वृतान्त

शाश्वत आणि सर्वांगीण विकास करून गडचिरोलीला सक्षम बनवणार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

लॉयड्सच्या कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १५ नोव्हेंबर 

खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या गडचिरोलीचे आम्हाला शोषण नाही तर दोहन करायचे आहे. शाश्वत विकास हे आमचे लक्ष्य आहे. या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करून भविष्यात गडचिरोलीला सक्षम करण्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. लॉईडस अँड मेटल एनर्जी ली. चे वतीने बोदली येथे उभारण्यात आलेल्या लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेनरशिप केंद्राचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री जुअल ओराम यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

लॉयड्सने गडचिरोली परिसरात केलेला विकास हा नफा केंद्रित नव्हे तर माणूस केंद्रित असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, समाजाला सोबत घेऊन जेव्हा सर्वसमावेशक विकासाकडे जातो, तेव्हा सोशल प्रॉफिट म्हणजे समाजाचे आशीर्वाद मिळतात. ते काम लॉयड्सच्या माध्यमातून येथे होत आहे. जे कधी काळी नक्षलवादी होते ते आता प्रशिक्षण घेऊन कर्मचारी म्हणून काम करीत आहेत. वेगवेगळ्या उद्योगांस लागणारे मनुष्यबळ या केंद्रात तयार होत आहे. पाच वर्षापूर्वी येथे यायला घाबरायचे आज येथील तरुणी विदेशात जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत, हा बदल आहे.
येथे येत असलेल्या उद्योगांमुळेl थोडी बहुत झाडे कापावी लागली तरी, वनांचे रक्षण झाले पाहिजे त्यासाठीच गडचिरोलीत ५ कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला. त्यापैकी एक कोटी झाडे लावली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी  सांगितले. हरित गडचिरोली अधिक हरित करण्याचे काम करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी केंद्रीय मंत्री ओराम यांचेही भाषण झाले.  लॉयड्सचे प्रबंध संचालक बी. प्रभाकरन यांनी प्रास्ताविक केले.

याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अडीच हजार नियुक्ती पत्रांचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. ॲडव्हान्स मिनरल प्रोसेसिंग वर्कशॉप, लॉयडस सेंट्रल किचन, ग्रीवन्स रिड्रेसल पोर्टल या उपक्रमांचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाला गडचिरोलीचे खा. नामदेव किरसान, आ. धर्मराव बाबा आत्राम, आ. डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गडचिरोलीतील स्थानिक तरुण आणि महिलांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम आणि स्वावलंबी बनवणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

उपलब्ध प्रमुख प्रशिक्षण अभ्यासक्रमात  वेल्डिंग, इलेक्ट्रिकल, सोलर तंत्रज्ञान, प्लंबिंग, एमईपी आणि दुचाकी वाहन दुरुस्ती. बांधकाम, गवंडीकाम, बार बेंडिंग आणि सुरक्षा रक्षक. असोसिएट, आणि सप्लाय चेन, हॉटेल मॅनेजमेंट, पाककला, फूड अँड बेव्हरेज, फ्रंट ऑफिस, हाऊसकीपिंग, पर्यटन आणि मूलभूत डिजिटल कौशल्ये आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात २० हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या बळावर लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल अँड एंटरप्रेन्योरशिपने आतापर्यंत २५०० हून अधिक स्थानिक युवकांना रोजगार मिळवून दिला आहे. ऑस्ट्रेलियापासून पापुआ न्यू गिनीपर्यंत आदिवासी तरुणांच्या कौशल्यांना जागतिक संधींशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ही संस्था करत आहे.

फडणवीस यांनी येथील जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचे कौतुक केले. हा संस्थान कोणत्याही जागतिक दर्जाच्या संस्थेपेक्षा कमी नसल्याचे नमूद करत, येथे दिले जाणारे प्रशिक्षण गडचिरोलीतील युवकांना जगात कुठेही रोजगार मिळविण्यास सक्षम बनवेल, असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री जुएल ओराम यांनीही  लॉयड्सच्या प्रकल्पांना भविष्याचा वेध घेणारे आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करणारे उपक्रम असे संबोधले. उपस्थितांना संबोधित करताना लॉयड्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी गडचिरोलीच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी आराखडा मांडला. या प्रदेशात २० हजार कोटींची गुंतवणूक प्रस्तावित असून, त्यामध्ये पूर्णपणे स्वदेशी दृष्टिकोनातून राबविण्यात येणाऱ्या १० हजार कोटींच्या एका महत्त्वपूर्ण उपक्रमाचाही समावेश आहे. आशियातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, आम्ही आतापर्यंत ४५०० लोकांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला आहे आणि ही तर केवळ सुरुवात आहे. याच मातीतील युवक अभियंते, डॉक्टर, व्यावसायिक आणि अगदी आमच्या लॉयड्स सक्षम उपक्रमाच्या माध्यमातून इंडिगोचे व्यावसायिक वैमानिकदेखील बनतील. आज गडचिरोलीतील लोक पापुआ न्यू गिनी येथे केवळ कामगार म्हणून नव्हे, तर जागतिक विकासाचे भागीदार म्हणून जात आहेत.

बोदली येथे स्थित असलेल्या  एल एम जी एस इ मध्ये १००० हून अधिक विद्यार्थ्यांच्या निवासासाठी निवासी वसतिगृहांची सुविधा उपलब्ध आहे. वर्गातील शिक्षण आणि प्रत्यक्ष रोजगार यांच्यातील दरी भरून काढण्याचे काम ही संस्था करत आहे.

 

 

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!