महिनाभर प्रशासनाची प्रतीक्षा करूनही कार्यवाही नाही ; चिरेपल्ली–खांदला रस्ता नागरिकांनी केला दुरुस्त
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.१९ नोव्हेंबर
गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असलेल्या चिरेपल्ली–खांदला–आलापल्ली या सुमारे २२ कि.मी. रस्त्याचा प्रश्न अखेर ग्रामस्थांनीच सोडविला. प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन, आंदोलन करूनही रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बुधवारी प्रशासनाच्या भरवशावर न बसता स्वतःच्या पैशातून साहित्य खरेदी करून आणि श्रमदानातून रस्ता वाहतुकीयोग्य तयार केला.
२१ ऑक्टोबर पासून सलग तीन दिवस ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. आंदोलनाला एक महिना उलटून गेला, तरी रस्त्याच्या प्रश्नावर प्रशासनाकडून अद्याप कोणताही कार्यवाही अहवाल मिळालेला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
चिरेपल्ली, पत्तीगाव, कोत्तागुडम आणि मरनेली परिसरातील नागरिकांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था कायम असल्याने शाळकरी विद्यार्थी, गरोदर महिला, रुग्ण, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
सध्या शेतीचा हंगाम सुरू असून शेतमाल बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी रस्ता अत्यावश्यक आहे. मात्र खराब रस्त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून कायमस्वरूपी रस्ता तयार होण्याची प्रतीक्षा करत बसण्यापेक्षा ग्रामस्थांनीच पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला. बुधवारी सकाळपासून चिरेपल्ली, पत्तीगाव, कोत्तागुडम आणि मरनेली येथील शेकडो महिला, पुरुष व युवक श्रमदानासाठी रस्त्यावर उतरले. ग्रामस्थांनी स्वतःच्या खिशातून पैसे गोळा करून मुरूम व इतर साहित्याची व्यवस्था केली. ट्रॅक्टरच्या मदतीने मुरूम टाकण्यात आला, तर अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वतः हाताने खड्डे बुजवून रस्ता तात्पुरता वाहतुकीसाठी खुला केला.
कायमस्वरूपी रस्ता केला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार
शासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. लवकरच गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व गावकरी एकत्र येऊन आमरण उपोषण करणार.
किरणकुमार मोकाशी , सामाजिक कार्यकर्ते अहेरी



