विशेष वृतान्त

आदिवासींच्या जल, जंगल, जमिनीच्या रक्षणासाठी सरकारकडे ठोस धोरण नसताना जनजातीय गौरव दिवसाचा गाजावाजा कशासाठी?

भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त शेतकरी नेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा केंद्र आणि राज्य सरकारला सवाल

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.१५ नोव्हेंबर 

क्रांतीसूर्य, धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या स्वाभिमानासाठी, हक्कांसाठी आणि जल, जंगल, जमिनीच्या संरक्षणासाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध ऐतिहासिक लढा उभारला. मात्र, आज स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही आदिवासी बांधवांना आपल्या हक्कांच्या संरक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे. एकीकडे भगवान बिरसा मुंडा यांच्या नावाने जनजातीय गौरव दिवस साजरा केला जातो, तर दुसरीकडे आदिवासींच्या जमिनी आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर संकट निर्माण होत आहे. ही सरकारची दुटप्पी भूमिका असल्याची घणाघाती टीका महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली. मुरमुरी येथे आयोजित भगवान बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी महेंद्र ब्राह्मणवाडे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या मूलभूत प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचे चित्र आहे. एटापल्ली आणि भामरागडसारख्या आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये खनिज उत्खनन, जमीन अधिग्रहण आणि औद्योगिक प्रकल्पांच्या नावाखाली स्थानिकांच्या जमिनी, जंगल आणि पर्यावरणावर परिणाम होत असून अनेक ठिकाणी आदिवासी शेतकऱ्यांना आपल्या जमिनी वाचविण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे.

भगवान बिरसा मुंडा यांनी ज्या जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठी संघर्ष केला, त्याच संसाधनांपासून आज आदिवासी बांधवांना वंचित करण्याचे प्रयत्न होत असतील, तर जनजातीय गौरव दिवस साजरा करण्याला काय अर्थ आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सरकारकडून आदिवासींच्या विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जातात. विविध योजना आणि उत्सवांच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या गौरवाचा गजर केला जातो. मात्र, प्रत्यक्षात आदिवासींच्या जमिनींचे संरक्षण, रोजगार, शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न अद्याप कायम आहेत. आदिवासींच्या संमतीशिवाय त्यांच्या जमिनींवर कोणतेही प्रकल्प लादले जाऊ नयेत. विकासाच्या नावाखाली स्थानिकांचे अस्तित्व, संस्कृती आणि पारंपरिक हक्क धोक्यात येता कामा नयेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ जनजातीय गौरव दिवसाच्या कार्यक्रमांपुरते आदिवासी समाजाशी नाते न ठेवता प्रत्यक्ष गावागावांत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. आदिवासी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावेत. त्यांच्या जल, जंगल आणि जमिनीच्या संरक्षणासाठी प्रभावी धोरण आखावे. अन्यथा भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा गौरव केवळ भाषणांपुरताच मर्यादित राहील, अशी टीकाही ब्राह्मणवाडे यांनी केली.

आदिवासींचा गौरव उत्सव साजरा करून नव्हे, तर त्यांच्या हक्कांचे संरक्षण करून सिद्ध झाला पाहिजे. शासनाने आता घोषणांपेक्षा कृतीतून आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल कोठारे, काँग्रेस नेते नदीम नाथानी, सपना शेडमाके, गजानन बोमनवार, आनंदराव बावणे, प्रमोद मुनगेलवार, गुरुदास शेंडे, आत्माराम निकोडे, आबाजी गावतुरे, नाजूक शेडमाके, राजू मोहरले, अरविंद मोहरले, नंदाजी शेंडे, दशरथ वाडगुरे, शामराव मोहुर्ले, रामदास कांबळे, परशुराम वाडगुरे, अनिल मोहुर्ले, पुंडलिक मेश्राम यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!