आपला जिल्हाविशेष वृतान्त

महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांचा अचानक सिरोंचा दौरा नेमका कशासाठी? राजेश अग्रवाल यांनी मेडीगट्टा बॅरेज सह वडधम येथील फॉसिल्स पार्कची केली पाहणी

तेलंगणा सरकारच्या तुमडीहेट्टी या प्रस्तावित सिंचन प्रकल्पाची पार्श्वभूमी तर नाही ना? स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या चर्चेला उधाण

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.१ नोव्हेंबर 

रविवारी ऐन साप्ताहिक सुटीच्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अचानकपणे झालेल्या सिरोंचा दौऱ्याला घेऊन गडचिरोली जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आले आहे.

राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज १ नोव्हेंबर रोज रविवार ला गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याचा अचानक दौरा करत विविध विकासकामांची पाहणी केली. विशेष म्हणजे, महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागातील सिरोंचा तालुक्यात त्यांनी प्रत्यक्ष भेटी देत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, त्यांच्या या दौऱ्यात तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेडीगड्डा बॅरेजच्या पाहणीने सर्वाधिक लक्ष वेधून घेतले.

राजेश अग्रवाल हे सिरोंचा येथे दाखल झाले. त्यानंतर सिरोंचा विश्रामगृह, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, वडदम येथील फॉसिल्स पार्क,  मेडीगड्डा बॅरेज, तुमनूर येथील ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र अशा विविध ठिकाणी त्यांनी भेटी देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते.

गोदावरी नदीवरील या प्रकल्पाच्या बॅकवॉटरचा फटका सिरोंचा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना बसल्याच्या तक्रारी यापूर्वी समोर आल्या आहेत. नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने शेती आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विशेष म्हणजे, सिरोंचा तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी मेडीगड्डा प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या. मुख्य सचिवांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

उल्लेखनीय आहे की सध्या मेडीगट्टा बॅरेजचा काही भाग खचलेल्या अवस्थेत असून संपूर्ण बॅरेज हे पाणी साठवणूकीच्या दृष्टीने धोकादायक असल्याचा तेलंगणा सरकारचा अहवाल आल्यानंतर बंद अवस्थेत आहे. या बॅरेजचे सर्व दरवाजे उघडे ठेवलेले आहेत. मात्र दुसरीकडे, नुकतेच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तुमडीहेटी सिंचन प्रकल्पासंदर्भात सविस्तर चर्चा केली होती. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे तेलंगणा सरकारच्या वतीने सांगण्यात आले होते.या पार्श्वभूमीवर लगेचच महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांनी सिरोंचा तालुक्यात हजेरी लावणे आणि मेडीगड्डा बॅरेजची पाहणी करणे यामुळे विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.

एकीकडे गोदावरी नदीच्या पाण्याचा लाभ तेलंगणा राज्याला मिळत असताना, दुसरीकडे बॅकवॉटरमुळे सिरोंचा तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत असल्याचा मुद्दा उपस्थित होत आहे.

मुख्य सचिवांचा हा दौरा केवळ विकासकामांची पाहणी करण्यापुरता मर्यादित होता की, महाराष्ट्र आणि तेलंगणा यांच्यातील सिंचनविषयक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वपूर्ण हालचाली सुरू आहेत? मेडीगड्डा प्रकल्पाच्या पाहणीनंतर, तुमडीहेट्टी प्रकल्पाला घेऊन निर्माण होऊ घातलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या अधोरेखित करणार काय? या सारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हा दौरा होता काय?. एकंदरीत, मुख्य सचिवांच्या अचानक सिरोंचा दौऱ्याने विकासकामांसोबतच सीमावर्ती भागातील सिंचनाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!