आपला जिल्हा

एटापल्लीतील आलदंडी येथील नदीपात्र रेती तस्करीच्या विळख्यात

वन, महसूल विभागासह पोलीस गस्त ही ठरतीय कुचकामी, पोलीस विभागाचे cctv कॅमेरे ही घेत आहेत बघ्याची भूमिका 

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क करीता, विनोद चव्हाण, एटापल्ली प्रतिनिधी 

तालुक्यातील आलदंडी नदीपात्रात सध्या अवैध रेती तस्करीचा धुमाकूळ सुरू असून, हे संपूर्ण प्रकरण महसूल, वन आणि पोलिस प्रशासनाच्या डोळ्यादेखत चालत असल्याने  नागरिकांकडून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. रात्रीच्या अंधारात ट्रॅक्टरच्या साहाय्याने बेधडकपणे रेती उपसा सुरू असून, यामुळे केवळ पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. दुसरीकडे नदीचा जलस्तर कमी होत आहे. यामुळे ग्रामस्थांचे जीवनही धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून आलदंडी नदीपात्रात अवैध रेती उपशाचे प्रमाण भयावह स्वरूप धारण करत आहे. नागरिकांनी वारंवार महसूल आणि पोलिस प्रशासनाकडे तक्रारी दिल्या. परंतु असूनही  कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने तस्करांचे मनोबल अधिकच वाढले आहे. रात्रीच्या वेळी नदीकिनारी वाहने भरधाव वेगात धावत असून, त्यांच्या धुळीच्या लोटामुळे आणि आवाजामुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

या बेकायदेशीर उत्खननामुळे आलदंडी नदीचे नैसर्गिक संतुलन ढासळले आहे. नदीतील पाण्याची पातळी झपाट्याने घसरत असून, याचा परिणाम संपूर्ण जलसाठ्यावर आणि पशुपालन, शेतीवर होतो आहे. काही ठिकाणी नदीचा प्रवाहच बदलल्याचे चित्र दिसत आहे, जे भविष्यात मोठ्या नैसर्गिक आपत्तींना निमंत्रण देऊ शकते.

घरभेदी अधिकाऱ्यांच्या संधीसाधूपणामुळेच वाढतेय रेतीतस्करीचे साम्राज्य !
एटापल्ली तालुक्यात रेती तस्करीच्या साखळीत महसूल विभागातीलच काही ‘घरभेदी’ अधिकारी आणि कर्मचारी सक्रिय भागीदार असल्याचे धक्कादायक वास्तव आता समोर येत आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी अवैध रेती तस्करांवर कारवाईचा इशारा दिला असला, तरी येथे हे आदेश केवळ कागदावरच राहत आहेत. काही अधिकारी तस्करांना वेळेआधी ‘लोकेशन’ व ‘रेकी’ची माहिती देत असून, त्यांचे कॉल डिटेल्स, लोकेशन शेअरिंग, आणि सततचा संपर्क तपासला तर महसूल खात्यातीलच मोठ्या घरभेदी जाळ्याचा पर्दाफाश होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणी स्वतंत्र तपास यंत्रणेकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

पर्यावरणप्रेमीं कडून कारवाईची मागणी

परिस्थिती हाताबाहेर जात चालल्याने पर्यावरण प्रेमी, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे मागणी करताना म्हटले आहे की, जर प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलली नाहीत तर हे दुर्लक्ष एटापल्लीसाठी विनाशकारी ठरेल. प्रशासनाने रेती तस्करीवर नियंत्रण आणण्यासाठी स्वतंत्र पथक, सीसीटीव्ही यंत्रणा, आणि नियंत्रण कक्ष सुरू करावा. 

रेती तस्करी विरोधी पथक तैनात

अवैध रेती तस्करीच्या प्राप्त तक्रारीची प्रशासनाने योग्य ती दखल घेतली आहे. रेती तस्करी विरोधी पथक तैनात केले आहे. जो कोणी दोषी आढळेल त्याचेवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. यापूर्वी सुद्धा प्रशासनाने अनेक कारवाया केल्या आहेत.

हेमंत गांगुर्डे, तहसीलदार एटापल्ली

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!