फरफट; सिरोंचातील कापूस उत्पादक शेतकरी खाजगी दलालांच्या विळख्यात
तालुक्यात कुठेही जिनिंग फॅक्टरी नसल्याने सी सी आय चे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात अडचण ; उत्पादन खर्चामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षित दर न मिळाल्याने जीव टांगणीला
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २३ नोव्हेंबर
सिरोंचा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या खाजगी दलालांच्या सापडला असून, कापूस विक्रीसाठी स्थानिक पातळीवर पर्याय उपलब्ध नसल्याने बळीराजाची कोंडी झाली आहे. तालुक्यात कुठेही जिनिंग फॅक्टरी नसल्याने सी सी आय चे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात अडचण येत आहे. उत्पादन खर्चामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षित दर न मिळाल्याने जीव टांगणीला लागला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी, अहेरी, एटापल्ली, भामरागड, मुलचेरा आणि सिरोंचा या तालुक्यातील जवळपास ६ हजारांहून अधिक शेतकरी कापूस उत्पादक आहेत. यातून ते जवळजवळ ८० हजार क्विंटल कापूस उत्पादन करीत आहेत. मात्र चामोर्शी तालुक्यातील अनकोडा येथील खाजगी जिनिंग फॅक्टरी मधील एकमात्र शासकीय हमीभाव खरेदी केंद्र वगळता दुसरे खरेदी केंद्र नाही. फेडरेशनचे मुख्य कार्यालय वणी येथे आहे. आणि गडचिरोली जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना त्यांचा कापूस चंद्रपूर जिल्ह्यातील केंद्रांवर न्यावा लागतो. पण त्यासाठी त्यांना अतिरिक्त प्रवास भाडे मोजावे लागते. कष्टाने पिकविलेला कापूस योग्य दरात विकता येत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना नाईलाजाने खासगी दलालांच्या दारात जावे लागत आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत कापसाच्या दरात तसेच वजनात ओलाव्याच्या नावाखाली मोठी कपात करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
स्थानिक बाजारपेठेचा अभावामुळे शेतकरी दलालांच्या मर्जीवर
सिरोंचा तालुक्यात जवळपास २ हजार कापूस उत्पादक शेतकरी असुन त्यांचे मार्फत २० क्विंटल कापसाचे उत्पादन होते.
स्थानिक पातळीवर हमीभाव कापूस विक्रीची व्यवस्था उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. उत्पादनासाठी लागणारा खर्च, मजुरी, वाहतूक आणि इतर खर्च वाढत असताना कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. कापूस विक्रीसाठी खासगी व्यापारी किंवा दलालांवर अवलंबून राहावे लागत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढत आहेत.
चांगला दर मिळण्याच्या अपेक्षेने काही शेतकरी आपला कापूस शेजारील तेलंगणा राज्यातील बाजारपेठेत विक्रीसाठी नेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे तसेच त्यासाठी ८२ रुपये शुल्क भरणे बंधनकारक केले जात आहे. बाजार समिती कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काहीही करीत नसताना हे शुल्क म्हणजे एक प्रकारचा जिझिया कर असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा आणि कापूस विक्रीतील आर्थिक नुकसान तातडीने थांबावे, यासाठी सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीने या प्रश्नावर तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.
सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीने तालुक्यात कापसाची थेट खरेदी व्यवस्था सुरू करण्यासाठी बाजार समिती मार्फत सहकारी जिनिंग मिल सुरू करण्याचा प्रस्ताव केला आहे. यासाठी आवश्यक असलेली ४ एकर जमीन उपलब्ध करून द्यावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना २०२४ मध्ये एक प्रस्ताव दिला आहे. मात्र गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांनी यावर कोणतीही कारवाई केली नसल्याने जिनिंग चा प्रस्ताव तसाच पडून आहे.
केंद्र सरकारच्या हमीभाव निश्चिती धोरणानुसार वर्ष २०२६-२७ करीता कापसाला दोन ग्रेड मध्ये मध्यम लांबीच्या कापसाला ८२६८ आणि लांब धाग्याच्या कापसाला ८६६८ रुपये असा हमीभाव दिला आहे. मात्र स्थानिक दलाल ७५०० ते ८५०० रु क्विंटल या भावाने खरेदी करत आहेत. तर कापसातील ओलावा ८ ते १२ टक्के कपात करण्याच्या सरकारच्या धोरणाला हरताळ फासून १५ ते १८ टक्के ओलावा कपात केला जात आहे. याला ‘ कट ‘ असे म्हटले जाते. यामुळे शेतकऱ्यांचे क्विंटल मागे १००० रुपयांचे जागेवरच नुकसान होत असल्याची ओरड आहे. याच कापसाला चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, अकोला जिल्ह्यात ९ हजारांहून अधिक किंमत मिळत आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्राचे स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आणि राज्य सरकार पर्यंत योग्य पाठपुरावा होत नसल्याने सिरोंचा तालुक्यासह दक्षिण गडचिरोलीतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची फरफट होत असल्याचे दिसून येत आहे.
जमिनीअभावी जिनिंगचा प्रस्ताव लांबणीवर
फेडरेशनचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी जिंनिंग मिल त्या ठिकाणी असणे, ही मुख्य अट आहे. त्या दृष्टीने आम्ही गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांकडे २०२४ ला ४ एकर जमिनीची मागणी करणारे पत्र दिले आहे. परंतु दोन वर्ष उलटून सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
सतिश गंजीवार, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, सिरोंचा



