पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २२ नोव्हेंबर
गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देणारा लॉयड्स मेटल्स ॲंड एनर्जी लिमिटेड हा उद्योग गडचिरोली जिल्ह्यात रोजगारनिर्मिती, सामाजिक विकास आणि स्थानिक समुदायांच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारा ठरला आहे. हे यश अल्पावधीत प्राप्त करून देणारे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांना ‘ग्लोबल पीस ऑनर्स २०२६’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया येथे दिव्यज फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या गौरवामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासह सामाजिक परिवर्तनाच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची ओळख मिळाली आहे.
बी. प्रभाकरन यांचा औद्योगिक प्रवास १९९३ मध्ये एका एक्स्कॅव्हेटरपासून सुरू झाला. मेहनत, दूरदृष्टी आणि उद्योग क्षेत्रातील अनुभवाच्या बळावर त्यांनी पुढे मोठी वाटचाल केली. २०१८ मध्ये लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गडचिरोलीतील सुरजागड प्रकल्पाच्या विकासाला नवी दिशा मिळाली. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधांच्या विस्ताराला चालना मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आदिवासीबहुल आणि मागासलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीमध्ये उद्योगाच्या माध्यमातून आर्थिक व सामाजिक परिवर्तन घडविण्याच्या दिशेने लॉयड्स मेटल्सने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देणे आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, यावर कंपनीच्या विविध उपक्रमांत भर दिला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात बी. प्रभाकरन यांच्या नेतृत्वाची विशेष चर्चा होत आहे.
केवळ उद्योगवाढीपुरते मर्यादित न राहता शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, कौशल्य प्रशिक्षण, शेतकरी कल्याण आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रांतही लॉयड्स मेटल्सच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा, आरोग्यसेवा, महिलांना रोजगाराभिमुख संधी, वृक्षलागवड आणि स्थानिक समुदायांच्या जीवनमानात सुधारणा घडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. औद्योगिक प्रगतीसोबत सामाजिक बांधिलकी जपण्याच्या या भूमिकेमुळे त्यांच्या कार्याला व्यापक महत्त्व प्राप्त झाले आहे.
‘ग्लोबल पीस ऑनर्स’ हा दिव्यज फाउंडेशनच्या वतीने शांतता, मानवता, धैर्य, सामाजिक योगदान आणि त्याग यांसारख्या मूल्यांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणारा पुरस्कार आहे. या पुरस्कारासाठी बी. प्रभाकरन यांची निवड होणे, हा त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकार्याचा गौरव मानला जात आहे.
बी. प्रभाकरन यांना मिळालेला हा सन्मान केवळ एका उद्योग नेतृत्वाचा गौरव नसून, गडचिरोलीच्या बदलत्या विकासयात्रेला राष्ट्रीय स्तरावर मिळालेली प्रतिष्ठा असल्याची भावना जिल्ह्यात व्यक्त होत आहे. त्यांच्या या गौरवाबद्दल उद्योग क्षेत्रासह विविध स्तरांतून अभिनंदन व्यक्त केले जात आहे.