आपला जिल्हाताज्या घडामोडी

गडचिरोली जिल्ह्यातील विविध मागण्यांना घेऊन नागपूर विधानभवनावर धडक देण्यासाठी १७५ किलोमीटर भव्य पायी मोर्चा

शेतकरी नेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात शेतकरी संघर्ष कृती समिती व काँग्रेस पक्षाच्या वतीने काढला जाणार पायी मोर्चा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १८ नोव्हेंबर

शेतकरी, शेतमजूर, आदिवासी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आता जिल्ह्यातून थेट नागपूर विधानभवनावर धडक देण्याची तयारी सुरू झाली आहे. शेतकरी संघर्ष कृती समिती व काँग्रेस पक्षाच्या वतीने १ ते ८ डिसेंबर २०२६ या कालावधीत गडचिरोली ते नागपूर असा तब्बल १७५ किलोमीटरचा भव्य पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रमुख मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनातून शासनाचे लक्ष
वेधण्याचा निर्धार आयोजकांनी केला आहे.

या पायी मोर्चाची सुरुवात १ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातून होणार असून, ८ डिसेंबर रोजी नागपूर विधानभवनावर मोर्चा धडकणार आहे. ‘चला हक्कांसाठी चालू या’ असा नारा देत शेतकरी, शेतमजूर, युवक, महिला, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

१८ प्रमुख मागण्यांसाठी सरकारविरोधात
रणशिंग
गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर या मोर्चात आवाज उठविण्यात येणार आहे. गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यातील
विमानतळ, एमआयडीसी, समृद्धी महामार्गासह अन्य विकासप्रकल्पांसाठी सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करू नयेत, तसेच शेतकऱ्यांशी चर्चा करूनच संमती घ्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे

गडचिरोली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती
लक्षात घेऊन संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित
करावा, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व
नुकसानभरपाई द्यावी, सोयाबीन व कापसाला
हमीभाव मिळावा, शेतीसाठी २४ तास अखंडित
वीजपुरवठा करावा, अशा मागण्याही करण्यात
आल्या आहेत. याशिवाय बांबू, हत्ती सह रानटी जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देऊन कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अल्प पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, चंद्रपूर जिल्ह्यातील गोसेखुर्द कालव्याच्या विस्तारीकरणाचे काम तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यात मागील चार-पाच
वर्षांपासून रानटी हत्ती व वाघांच्या वाढत्या
वावरामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. या
नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना हेक्टरी
एक लाख रुपये द्यावेत, तसेच प्रत्येक तालुक्यातील कालव्याच्या ठिकाणी सिंचनासाठी पाणी नियमित उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही मोर्चातून केली जाणार आहे. जिल्ह्यातील वाढत्या बेरोजगारीवर उपाययोजना कराव्यात, अनुसूचित क्षेत्रातील पेसा व वनहक्क कायद्यांतर्गत प्रलंबित दावे तातडीने निकाली काढावेत, धानाला बोनस देऊन शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, डोंगरदऱ्यांमुळे करण्यात आलेल्या शेतीच्या सर्वेक्षणातील त्रुटी दूर कराव्यात, गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यातील रिक्त पदांची भरती तातडीने करावी, तसेच २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळा बंद करू नयेत, अशा विविध मागण्यांचा समावेश आहे. दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या
मत्स्यव्यवसाय, मत्स्यबीज बांधव आणि संबंधित नागरिकांच्या रोजगारावर झालेल्या परिणामांची दखल घेऊन त्यांना आर्थिक मदत व विशेष उपजीविका योजना लागू करावी, ग्रामीण व दुर्गम भागातील खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच एटापल्ली व भामरागड तालुक्यातील लोहखनिज उत्खननासाठी नव्याने दोन हजार हेक्टर जमीन राखीव ठेवण्याचा शासन
निर्णय तात्काळ रद्द करावा, अशा मागण्याही
मांडण्यात आल्या आहेत.

शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांना
सहभागी होण्याचे आवाहन

या आंदोलनाच्या माध्यमातून केवळ शेतकऱ्यांचेच नव्हे, तर आदिवासी, बेरोजगार युवक, महिला, विद्यार्थी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न शासनदरबारी मांडले जाणार आहेत. त्यामुळे हा पायी मोर्चा जनतेच्या हक्कांचा लढा ठरणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.  शेतकरी नेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन आपल्या हक्कांसाठी एकजूट दाखवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!