मरपल्ली नाल्यावरील पुलासाठी गावकऱ्यांचे नाल्यात उतरुन आंदोलन
१० दिवसांचे आत काम सुरू करा, अन्यथा नाल्यात बसून उपोषण करणार, ग्रामस्थांचा इशारा
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ९ ऑगस्ट, एटापल्ली प्रतिनिधी विनोद चव्हाण
जागतिक आदिवासी दिनाच्या उत्साहाला छेद देत एटापल्ली तालुक्यातील मरपल्ली गावाकडे जाणाऱ्या नाल्यावरील पुलाची दुरवस्था पुन्हा एकदा प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असताना प्रशासन अखेर कोणाचा जीव जाण्याची वाट पाहत आहेत? असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित करीत थेट नाल्यात उतरून आंदोलन केले.
मरपल्लीकडे जाणाऱ्या मार्गावरील नाला व पुलाची अवस्था अत्यंत गंभीर झाली आहे. पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. पुलाच्या दुरुस्तीसाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. तालुका काँग्रेसचे प्रमुख नेते तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रज्वल नागूलवार यांच्या नेतृत्वाखाली भूमिया फकरी रापंजी, बम्मा रापंजी, किशोर मझ्झी, शिवाजी लेकामी, मधुकर रापंजी, सत्तू पुंगाटी, मनीष हेडो, करण हेडो, करण हलामी, मोतीराम गावडे, मधुकर मितलामी, निलेश लेकामी, रमेश बावणे, सुधाकर रापंजी, लालूजी लेकामी, गणेश कुळयेटी, अभिजित सिडाम, वाडुजी लेकामी, नरेश लेकामी, विलास हिचामी यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी प्रशासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त करीत रविवारी थेट नाल्यात उतरून शासन-प्रशासनाकडे जाब विचारत प्रतिक्रियात्मक आंदोलन केले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले, आम्ही अनेक वेळा शासन-प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र पुलाच्या दुरुस्तीबाबत अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार काय? आंदोलनकर्त्यांनी शासन-प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की, येत्या १० दिवसांच्या आत पुलाच्या दुरुस्तीबाबत शासनाकडून लेखी स्वरूपात ठोस आश्वासन मिळाले नाही, तर याच नाल्यात आमरण उपोषण सुरू करण्यात येईल.
यावेळी निष्क्रिय प्रशासनाचा निषेध करणाऱ्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. शासनाच्या दुर्लक्षाचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी आता आश्वासन नको, प्रत्यक्ष काम सुरू करा अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.



