पेसा समन्वयक म्हणून भुपती बाबुगीरी करणार ; गोंडवानाच्या कुलगुरुंचे १५ दिवसांनंतर स्पष्टीकरण
सह पालकमंत्री जयस्वालांनीही ओढली री; तीन महिन्यांसाठी नियुक्ती; केवळ कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ९ सप्टेंबर
आत्मसमर्पित नक्षलवादी वेणूगोपाल राव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्ती विरोधात गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समुहामध्ये प्रचंड जनक्षोभ उफाळून आला असून सदर नियुक्ती रद्द करावी अशी जोरदार मागणी सर्वत्र होत आहे. या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी नियुक्तीची प्रक्रिया आणि त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांचे स्वरूप स्पष्ट करताना म्हटले आहे की, वेणूगोपाल यांची जाहिरात, कागदपत्रांची छाननी व मुलाखत प्रक्रियेनंतर तीन महिन्यांसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडे केवळ कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी राहणार आहे. म्हणजेच भुपती पेसा समन्वयक म्हणून बाबुगीरी करणार असल्याचे स्पष्ट होते. उल्लेखनीय आहे की गडचिरोली जिल्हा महाग्रामसभेने नियुक्ती कोणत्या आधारावर केली गेली. हे स्पष्ट करण्याची मागणी केली होती.
विद्यापीठाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्राच्या कामकाजासाठी तीन समन्वयक नियुक्त करण्याचा निर्णय ९ जुलै २०२६ रोजी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर ११ ऑगस्ट २०२६ रोजी समन्वयक पदासाठी सरळ मुलाखतीची जाहिरात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. प्राप्त उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करून मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी तयार करण्यात आली.
समन्वयक पदासाठी १४ ऑगस्ट रोजी मुलाखती घेण्यात आल्या. यासाठी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या अध्यक्षतेखाली मुलाखत समिती गठित करण्यात आली होती. या समितीत डॉ. सतीश गोगुलवार व डॉ नरेश मडावी हे सदस्य होते. मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २९ ऑगस्ट रोजी निवड व प्रतीक्षा यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. या प्रक्रियेत वेणूगोपाल यांची तीन महिन्यांसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्तीच्या स्वरूपाबाबत विद्यापीठाने स्पष्ट केले आहे की, वेणूगोपाल यांच्याकडे फक्त कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी राहील. ग्रामसभा अथवा प्रशिक्षणामध्ये कोणत्याही विषयाचे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आलेली नसल्याचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी स्पष्ट केले आहे.
कुलगुरूंच्या प्रसिद्धी पत्रकानंतर गडचिरोली जिल्ह्याचे सह पालकमंत्री एड. आशिष जयस्वाल यांनी सुद्धा या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.
सदर स्पष्टीकरण देण्यास एवढा विलंब कां लागला? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. नियुक्ती वरुन मोठा गदारोळ आणि दबाव वाढल्याने जनक्षोभ शांत करण्यासाठी सारवासारव करीत विद्यापीठ प्रशासनाला भुपती पेसा समन्वयक म्हणून कोणतेही प्रशिक्षण देणार नाही. केवळ बाबुगीरी करेल असे स्पष्ट करावे लागले. असाही अर्थ काढला जात आहे.


