शेतकऱ्यांच्या समस्यांना घेऊन काँग्रेसचे एसडीओ कार्यालयावर घंटानाद आंदोलन
जिल्हाध्यक्ष ब्राह्मणवाडे व आमदार मसराम यांचे नेतृत्वात शेकडो शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित

गडचिरोली जिल्ह्याच्या ४४ व्या स्थापना दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २६ ऑगस्ट
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सोमवारी काँग्रेसच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देत घंटानाद आंदोलन करण्यात आले. आरमोरीचे आमदार रामदास मसराम आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
धान उत्पादकांचे चुकारे, धानाचा बोनस, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, पिक विमा कंपन्यांकडून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक, कृषी पंपाऐवजी सोलर पंपामुळे तसेच स्मार्ट मीटरमुळे उद्भवलेल्या समस्या, पीक नुकसानीची न मिळालेली भरपाई अशा शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत शासनाला निवेदन देऊनसुद्धा फरक पडला नसल्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे हे घंटानाद आंदोलन करण्यात आले.
वरील समस्यांमुळे जिल्ह्यातील बळीराजा अडचणीत आला असून यामुळे त्यांना उदरनिर्वाह करताना कसरत करावी लागत असल्याची व्यथा यावेळी मांडण्यात आली. याकडे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
आंदोलकर्त्यांना मुख्य दारावर अडविण्यात आल्यामुळे काही काळ काँग्रेसचे पदाधिकारी आणि पोलीस यांच्यात बाचाबाची होऊन थोडे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. नंतर एसडीओंनी आत येण्याची परवानगी दिल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले.