गडचिरोली आरमोरी महामार्गाची दुरुस्ती करा अन्यथा खड्ड्यात बसून आंदोलन करू
गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १२ जुलै
गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली आरमोरी महामार्गाची अवस्था बिकट झाली असून मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत परिणामी सर्वसामान्य नागरिकांना याचा फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. वारंवार निवेदन देऊन सुद्धा रस्ता दुरुस्ती करण्याकरिता दिरंगाई केली जात आहे. हा महामार्ग पुढील दोन दिवसांत दुरुस्त करा अन्यथा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये बसून गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करतील असा इशारा युकांचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड यांनी दिला आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असून सुद्धा जिल्ह्यामध्ये रस्त्यांची बिकट अवस्था अवस्था आहे. इतर विकास तर वाऱ्यावरच राहिला आहे . गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनात फक्त प्रभारी अधिकारी आहेत. पुर्णवेळ अधिकारी देण्याची मागणी सुद्धा गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसने केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनवू अशा बाता करतात आणि प्रशासन रस्त्यांची दुरुस्ती करू शकत नाही. केवळ पोकळ आश्वासन द्यायचे आणि नागरिकांच्या जीवाशी खेळायचे. असे किती दिवस चालणार असा प्रश्न देखील गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारला आहे. एवढा मोठा गडचिरोली जिल्हा असून सुद्धा राष्ट्रीय महामार्गाचा एक आणि अधिकारी पालकमंत्री देऊ शकत नाही स्वतः हेलिकॉप्टर नी दौरा करतात तर रस्त्यांची बिकट अवस्था यांना कळणार कधी? एकदातरी नागपूर ते गडचिरोली हा प्रवास बायरोड करावा म्हणजे त्यांना कळेल असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला आहे. पोलिस प्रशासनाच्या आकडेवारी नुसार जिल्ह्यातील अकराशे निष्पाप नागरिकांचा बळी या खड्डेमय रस्त्याने गेला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळन बंद अन्यथा ही जनता तुम्हाला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही असे म्हटले आहे.
यावेळी निवेदन देतांना गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितेश राठोड, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष विवेक घोंगडे युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव अभिजित धाईत, शहर उपाध्यक्ष सारंग हेमके, युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव गौरव येनप्रेड्डीवार, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष स्वप्निल बेहरे, एन एस यु आय चे महासचिव अभिषेक चौधरी उपस्थित होते.