हेलिकॉप्टर घ्या; पण तालुक्यात या’: सरकारविरोधात काँग्रेस करणार हेलिकॉप्टर वाटप आंदोलन

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २५ जून
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारुनही शेतकरी, मजूर, विद्यार्थी, महिलांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. प्रमुख अधिकाऱ्यांकडे लोकांना भेटायला वेळ नाही. त्यामुळे जिल्हा काँग्रेस कमिटी ‘हेलिकॉप्टर घ्या; पण गाव किंवा तालुक्यात या’, अशी घोषणा देत ऊद्या २६ जूनला गडचिरोलीत प्रतिकात्मक हेलिकॉप्टर वाटप आंदोलन करणार आहे.
गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात २६ जून गुरुवारी दुपारी २ वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे. मागील तीन वर्षांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद घेऊन विकासाची जबाबदारी स्वतःकडे घेतली. मात्र, प्रत्यक्षात जिल्ह्यातील जनतेच्या समस्या कमी होण्याऐवजी अधिकच वाढत चालल्या आहेत. वादळामुळे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही, रानटी हत्तींचा उपद्रव वाढला असतानाही त्यांचा बंदोबस्त करण्यात आला नाही, सुरजागड खाणीतून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे अपघात वाढले असून, रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अशा स्थितीत मान्सूनच्या आधी रस्ते बंद करण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर ओढवली आहे, यामुळे जिल्ह्यातील नागरिक फार त्रस्त आहेत, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी म्हटले आहे.
शाळा सुरू झाल्या मात्र विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता चांगल्या व सुरक्षित बसेस नाहीत. जेव्हा शेतकरी आणि अन्य नागरिक आपल्या समस्या घेऊन प्रशासकीय कार्यालयात जातात, तेव्हा त्यांचे प्रश्न मार्गी लागत नाही. कंत्राटदारांचे शासकीय कामांचे देयके थकीत आहेत, नवीन कामाचे नियोजन झाले नाही, पावसाळा सुरू होऊनही बऱ्याच घरकुल धारकांना रेती मिळाली नाही, त्यांची देयके थकीत आहेत, मनरेगाचे पैसे अजूनही मिळालेले नाहीत. ग्रामीण भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. बेरोजगारांना रोजगार नाही. जिल्ह्यात येणाऱ्या प्रकल्पांकरिता शेतकऱ्यांशी कुठल्या प्रकारची चर्चा न करता सरसकट जमिनी अधिग्रहीत करण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे. तालुक्यातील अनेक अधिकारी मुख्यालयी राहत नाही, त्यामुळे नागरिकांना वारंवार संबंधित कार्यालयात जावे लागते. एकूणच जिल्ह्यातील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
अशा स्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री म्हणून जनतेचे दु:ख समजून घ्यावे, अशी अपेक्षा आहे. परंतु मुख्यमंत्री गडचिरोतील केवळ शासकीय कार्यक्रमांसाठी हेलिकॉप्टरने येऊन लगेचच नागपूरला परत जातात. एवढेच नाही तर जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांचीदेखील हीच परिस्थिती आहे. सर्वसामान्य जनतेला भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही. नागरिक भेटायला गेल्यास ‘साहेब व्हीसीमध्ये किंवा बैठकीत व्यस्त आहेत’, असे उत्तर मिळते.
त्यामुळे पालकमंत्र्यांसह प्रमुख अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी गाव किंवा किमान तालुकास्थळी यावे, या मागणीसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने २६ जूनला हेलिकॉप्टर घ्या, पण गाव किंवा तालुकास्थळी या, हे अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकरी, महिला, तरुण, बेरोजगार व सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.