“दर्शन दे गा,देगा देवा भाऊ” पालकमंत्री फडणवीस यांना गडचिरोलीत बोलविण्यासाठी काँग्रेसकडून ६ जून ला महायज्ञ
गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अफलातून आंदोलन

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १ जून
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीसारख्या मागास आणि नक्षलग्रस्त जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारून स्वतःची प्रशंसा करून घेतली. मात्र पालकमंत्री पदाचा कारभार ते मुख्यमंत्री कार्यालयातूनच पहात आहेत. कांग्रेस ने पालकमंत्र्यांचे जिल्ह्यातील समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची बोचरी टीका करीत राजीनाम्याची मागणीही केली. परंतू फडणवीस यांनी विरोधी पक्षांना दाद दिली नाही. परिणामी कांग्रेसने हे अफलातून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली सारख्या मागास आणि नक्षलग्रस्त जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारून स्वतःची प्रशंसा करून घेतली. मात्र, आजतागायत त्यांनी येथील सामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कधीही संवाद साधलेला नाही. त्यांची जिल्ह्याला भेटही दुर्मिळ झाली आहे. असा आरोप करत जिल्हा काँग्रेसने ६ जून रोजी सेमाना देवस्थानात महायज्ञाचे आयोजन केले आहे. यामध्यमातून ते मुख्यमंत्री देवेंद्रांना जिल्ह्यात येऊन जनतेचे प्रश्न थेट सोडविण्यासाठी मारुती आणि महादेवाच्या समक्ष साकडे आंदोलन करणार आहेत.
मागील तीन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. रानटी हत्ती, वाघ, अस्वल यांचा मानवी वस्तीत वावर वाढल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहेत. शेतीला २४ तास वीजपुरवठा मिळत नाही. अद्याप शेतकऱ्यांना बोनस मिळालेला नाही. जिल्ह्यात असे अनेक प्रश्न प्रलंबित असताना पालकमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, त्यांना जिल्ह्यासाठी वेळ नाही. त्यामुळे प्रशासनावर कुणाचाही वचक राहिलेला नाही. वारंवार आंदोलन, मागण्या करूनही सर्वसामान्यांचे प्रश्न जैसे थे असल्याने काँग्रेसकडून ६ जून रोजी शहरातील सेमाना देवस्थानात महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून पालकमंत्री फडणवीस यांनी लवकरात लवकर जिल्ह्यात येऊन मागण्यांची दखल घ्यावी, अशी गळ आम्ही घालणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्रकाच्या माध्यमातून कळवले आहे. दरम्यान, समाज माध्यमावर काँग्रेसच्या या अफलातून आंदोलनाची जोरदार चर्चा आहे.