पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १ जून
गडचिरोली तालुक्यातील अवघ्या तीन
कि.मी. अंतरावरील अडपल्ली ग्रामपंचायत चे ग्रामसेवक दिलीप मेश्राम यांनी केलेला गैरव्यवहार प्रकरण सिद्ध झाल्यामुळे त्यांना
जि. प चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी निलबित केले आहे.
अडपल्ली ग्रामपंचायत चे ग्रामसेवक दिलीप मेश्राम हे गेल्या ७ वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत होते. त्यांनी निकृष्ट दर्जाची कामे करणे. विना टि.पी ची अवैध रेती उचल करणे, ई. टेंडर न करताच साहित्याची खरेदी करणे, अंदाजपत्रका शिवाय कामे करणे, ऑनलाईन आराखडयात मंजुर रकमेपेक्षा जास्त खर्च करणे कोटेशन ग्रामपंचायत च्या सभेत मंजुर न करणे, बांधकाम कामाकरीता मंजुरी न घेणे, घरटॅक्स वसुली केलेली रक्कम बँकेत जमा न करता अफरातफर करणे खरेदी रकमेच्या बिलातून २ टक्के जीएसटी न भरणे, स्वतःच्या मुलाच्या नावाने ई. टेंटर भरणे अशा
गैरकारभाच्या अनेक बाबी चौकशीत लक्षात आल्यामुळे पं. स. च्या गटविकास अधिकारी यांनी सदर प्रकरण गडचिरोलीचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना माहीती व पुढील कारवाईसाठी सादर केल्यानंतर झालेल्या चौकशीच्या आधारे ग्रामसेवक दिलीप मेश्राम यांना निलंबित करण्यात आले.
सदर गैरव्यवहार प्रकरणाची तक्रार सन २०२१ मधेच करण्यात आली होती परंतु ग्रामसेवक मेश्राम यांनी आपल्या राजकीय बळाचा वापर करुन प्रक्रिया बाधित करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पंसच्या गोटातून कळते.