प्रकल्पग्रस्तांचे बनावट प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या रॅकेटच्या गडचिरोली येथील सुत्रधारास अटक
अटकेतील आरोपींची संख्या सहा, एक अजूनही फरार
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. २५ एप्रिल
गडचिरोली जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पोलीस भरती मध्ये प्रकल्पग्रस्तांच्या नावावर बनावट प्रमाणपत्र जोडून पोलिसात भरती झालेल्या आणि तात्पुरत्या यादीत निवड झालेल्या सहाव्या आरोपीला सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याला सुद्धा पुढच्या सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. देविदास ऊर्फ बाळू मेश्राम असे आरोपीचे नाव असून तो बनावट प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या रॅकेटचा स्थानिक सूत्रधार असून यापूर्वीही त्याने अनेकांना पैसे घेऊन खोटे प्रमाणपत्र मिळवून दिल्याचे सूत्रांकडून समजते. यातील एक आरोपी धनराज रेचनकर हा फरार असून पोलीसांचे एक पथक त्याला शोधण्यासाठी रवाना झाले आहे. यापूर्वी शनिवारी अटक केलेल्या आरोपी मध्ये राकेश देवकुमार वाढई, वैभव दिलीप झाडे, आकाश रामभाऊ राऊत, मंगेश सुखदेव लोणारकर, आणि मिन्नाथ पुरुषोत्तम थोरात यांचा समावेश आहे.
२०२१ आणि २०२२ या वर्षाची गडचिरोली पोलीस चालक शिपाई व पोलीस शिपाई भरती प्रक्रिया १२ एप्रिल रोजी तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात विविध आरक्षणानुसार पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली. यात सर्वसाधारण, एससी, एसटी, महिला, प्रकल्पग्रस्त, खेळाडू अशा कोट्यातून उमेदवार निवडले गेले. एका निनावी तक्रारदाराच्या तक्रारी वरुन प्रकल्पग्रस्त या समांतर आरक्षणातील निवड झालेल्या उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांच्या पडताळणी केली असता प्रकल्पग्रस्तांच्या आरक्षणातील उमेदवारांनी बीड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त असल्याचे खोटे दाखले जोडल्याचे निष्पन्न झाले. एलसीबीने शनिवारी यातील पाच युवकांना ताब्यात घेतले आणि बनावट प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या रॅकेटचा स्थानिक सूत्रधार देविदास ऊर्फ बाळू मेश्राम यास सोमवारी अटक केली.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व आरोपींनी गुन्हे कबूल केले आहेत. उल्लेखनीय आहे की गडचिरोली जिल्ह्यात सद्यस्थितीत एकही प्रकल्पग्रस्त नाही. त्यामुळे जिल्ह्यातील उमेदवारांना प्रकल्पग्रस्त या समांतर आरक्षणात स्थान नाही. सर्व आरोपींनी अनेक वेळा परिक्षा देऊनही उत्तीर्ण न झाल्याने हा चुकीचा मार्ग निवडला.
मात्र देविदास ऊर्फ बाळू मेश्राम याने आकाश राऊत या आरोपींकडून २ लक्ष रुपये घेऊन प्रमाणपत्र मिळवून दिले. तर मंगेश लोणारकर याने ४ लक्ष १३ हजार, राकेश वाढई याने ३ लक्ष २० हजार, वैभव झाडे याने ३ लक्ष १५ हजार रुपये बाळू मेश्राम यास देऊन बनावट प्रमाणपत्र मिळवले. यात बाळूने स्वतःचेही प्रमाणपत्र तयार करून घेतले. अन्य एक आरोपी मिन्नाथ थोरात याने बीड येथे स्वतः जाऊन बनावट प्रमाणपत्र मिळवले. आरोपींपैकी कुणाचेही नातेवाईक बीड जिल्ह्यात नसून ते प्रकल्पग्रस्त नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यभर मोठे रॅकेट असण्याची शक्यता!
बनावट प्रमाणपत्र बनवून देणारे एक मोठे रॅकेट महाराष्ट्रात असून अनेक ठिकाणी त्यांचे एजंट फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. हे रॅकेट ज्या ज्या ठिकाणी शासकीय नोकरीसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येते त्या त्या ठिकाणी जाऊन एजंटांमार्फत आवश्यक असे खोटे प्रमाणपत्र मिळवून देण्याचे व पडताळणी दरम्यान ते प्रमाणपत्र खरे असल्याचे संबंधित विभागाकडून प्रमाणित करून देण्यापर्यंत या रॅकेटची मजल आहे. प्रकल्पग्रस्त खेळाडू आणि अपंग यासह आवश्यक वेगवेगळी बनावट प्रमाणपत्र तयार करून देण्याचे काम हे रॅकेट राज्यभर करत असते त्यामुळे या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे आव्हान गडचिरोली पोलीसांसमोर आहे.